Sunday, May 3, 2015

लेख क्र ५ चिंतेपेक्षा चिंतन महत्वाचे !

लेख क्र ५  चिंतेपेक्षा चिंतन महत्वाचे !

कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी (२७ फेब्रुवारी) मराठी दिन साजरा केला जातो. यावर्षीही या दिवशी फेसबुक आणि ट्वीटर मराठीच्या उमाळ्यांनी भरून वाहत होतं. मराठी भाषा टिकेल का? यावर चिंता वाहिली जात होती. कधी नाही ते मराठी कविता वगैरे भरभरून ऐकायला मिळत होत्या. आजकाल आपण विलक्षण उत्सवी लोक झालो आहोत. मराठी दिनी आपण पुरते मराठीमय होऊन जातो आणि हिंदी-दिनी हिंदीमय! पर्यावरण दिनी पर्यावरणमय तर विज्ञान दिनी विज्ञानमय! उत्सवप्रियतेचा एक फायदा असा असतो की काहीतरी फक्त ‘साजरं’ करायचं असतं, त्यावर ‘चिंतन’ करायचं नसतं. आता मराठी दिन सुद्धा इंग्रजी तारखेप्रमाणे साजरा होतो; मराठी तिथी प्रमाणे नाही, ती गोष्ट निराळी!

मुळात आपण मराठी आहोत म्हणजे नेमकं काय आहोत? केवळ व्यवहारात मराठी बोलणारा समूह म्हणून मराठी आहोत की आपलं एकूण वैयक्तिक-सार्वजनिक वर्तन मराठी आहे म्हणून मराठी आहोत? सकाळी नाश्त्याला दाक्षिणात्य इडली, दुपारी पंजाबी आणि रात्री चायनीज ही अन्न संस्कृती आपण (शहरात) स्वीकारली असेल तर आहारानं आपण मराठी राहिलोय का? मराठीची एवढी मोठी चिंता आपल्या सगळ्यांना लागून राहिली आहे तर मग आपणंच आपल्या मराठी शाळांना ओस पाडून आपल्याच मुलांना इंग्रजी शाळांच्या मोठ्या फिया सहन करत अट्टहासानं इंग्रजीतून शिक्षण का देत आहोत? माय मराठीच्या म्हणजे सख्ख्या आईच्या दुधापेक्षा इंग्रजी नावाच्या वाघिणीचे महागडं दूध जास्त श्रेयस्कर आहे; हे आम्ही काय म्हणून स्वीकारलं? आचार, विचार आणि उच्चारात आपण आज मराठी राहिले आहोत का? आणि मग मराठी जगली काय अन मेली काय, आपण त्यासाठी आक्रोश का करावा? जो सर्वात शक्तिमान (फीट) तो जगेल हा डार्विनचा सिद्धांत आपल्याला माहीत आहे, मग मराठी जर जगायला फीट असेल तर जगेल नाहीतर मरेल! तरीही मराठी जगली पाहिजे वगैरे आपण का बोलतो?

या बोलण्यामागे मोठा न्यूनगंड आहे. भारतीय म्हणून तो आहे तसाच मराठी म्हणूनही आहे. संस्कृती आणि भाषा यांना बघण्याच्या आपल्या दृष्टीकोनातून हा न्यूनगंड येतो. आपली संस्कृती किंवा भाषा मरेल असं वाटणं हाच एक मोठा न्यूनगंड आहे. जगाचा इतिहास असं सांगतो की मनुष्य भाषेला बदलवत असतो आणि त्याला सर्वात सोयीची असते तीच भाषा टिकते, कारण भाषा माणसासाठी आहे, माणूस भाषेसाठी नाही! मराठी मरेल असं ज्यांना वाटतं त्यांनी त्यांचा हा न्यूनगंड काढून टाकला पाहिजे. आपल्याला उगाचच वाटत असतं की भाषा आणि संस्कृती या आचरण करण्याच्या गोष्टी नाहीत, तर प्रदर्शनाच्या गोष्टी आहेत आणि त्या प्रदर्शानामुळंच त्या  टिकतात. आपल्या कोणत्याही, अगदी कोणत्याही, कार्यक्रमाची सुरुवात आपण करतो ती दीप-प्रज्वलनानं! जणू काही आमची संस्कृती टिकेल तर ती प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी ‘दिवे’ लावण्यानंच टिकेल, अन्यथा पटकन मरेल हा तो न्यूनगंड. त्या संस्कृतीच्या प्रदर्शानाचंही हल्ली एवढं विकृतीकरण होतंय की काही महाभाग पायातील चप्पल किंवा बूट काढण्याची तसदी न घेताच ‘दीप-प्रज्वलन’ करत असतात! जगभरात लोक असं प्रत्येक ठिकाणी संस्कृतीच प्रदर्शन करत नाहीत तरीही त्यांनी आपापली संस्कृती मात्र टिकवून ठेवलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून दीप प्रज्वलनानं प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात केली नाही तर संकृती मरेल हा न्यूनगंड आधी मनातून काढला पाहिजे.  

आपल्याला मराठीच्या जगण्याची चिंता असेल तर ती आपण सोडून दिली पाहिजे. मराठी ही इतकी सोपी, साधी, सरळ आणि म्हणूनच सामान्य माणसाला जवळ असणारी भाषा आहे की ती जगण्यास योग्य असणारच आहे. सर्वांनी वाळीत टाकलेला संन्याशाचा पोर सुद्धा ज्ञानेश्वरी नावाचे ‘देशीकार लेणे’ चढवून तिचे सौंदर्य वाढवू शकतो इतकी ती सामान्यांची भाषा असेल तर तिच्या मरण्याची भीती का बाळगायची? जी भाषा पैजेत “अमृतातेही’ जिंकते, असं प्रत्यक्ष ज्ञानेश्वर सांगतात ती मर्त्य कशी असू शकते?  मराठीत लिहिलेली ज्ञानेश्वरी जर साडेसातशे वर्षं टिकू शकते तर मराठी मरेल अशी शंका तरी का घ्यावी? अर्थात ज्ञानेश्वरी मराठीत लिहील्यामुळं टिकली हा फारच विचित्र समज होईल तो अशा अर्थानं की समजा तिच्यात मुलभूत विचार, साहित्यमूल्य नसतं तर ती केवळ मराठीत लिहिली आहे म्हणू टिकली नसती. दरवर्षी रद्दीभर मराठी साहित्य असतं जे येतं आणि जातं. त्याच्यात भाषा सोडून इतर कुठलंच मूल्य नसेल तर केवळ भाषेवर ते साहित्य टिकावं असं माननंच चूक आहे. शेवटी कुठलंही साहित्य आशय आणि अभिव्यक्ती या दोहोंचा संगम असेल तरच टिकतं आणि भाषा हे अभिव्यक्तीचं कितीही महत्वाचं माध्यम असली तरी आशयच नसेल तर उपयोग नाही. म्हणून मराठीच्या अभिव्यक्तीची चिंता करतांनाच आज मराठी माणसाकडे खरोखरच चांगला आशय आहे का यावरही चिंतन झालं पाहिजे.

असा आशय आज मराठी माणसाकडे दिसत नाही. त्यामुळं मराठीपुढे महत्वाचे प्रश्न उभे आहेत. काय आहेत हे प्रश्न? पुलंच्या नंतर मराठीत विनोदी लेखक कोणाला म्हणायचं? कुसुमाग्रज, गदिमां नंतर मराठी कवी कोणाला म्हणायचं? बाबासाहेब पुरंदरे सुदैवाने आपल्यात आहेत पण त्यांच्यानंतर शिवशाहीर कोणाला म्हणायचं? राम शेवाळकर, शिवाजीराव भोसले यांच्यानंतर मराठीत वक्ता कोणाला म्हणायचं? सुधीर फडके, राम कदम यांच्या नंतर संगीतकार कोणाला म्हणायचं? असे काही मोठे प्रश्न आपल्यासमोर आहेत आणि मराठीच्या सर्वच क्षेत्रात चालू असलेली ‘सुमारांची सद्दी’ हीच आपली महत्वाची चिंता असायला हवी.

मराठी माणूस बदलला हे खरं कारण आहे. त्याचा स्वभाव बदलला, दृष्टीकोन बदलला. मारवाडी मित्र मला म्हणाला, तुम्हा लोकांना पैसा कसा कमवावा ते नाही कळत! मी म्हणालो, म्हणून तर आम्ही इतरांपेक्षा समृद्ध झालो! मारवाडी-गुजराती माणसे पैसा कमावण्याच्या स्पर्धेत नेहमीच अव्वल राहिली पण त्यांच्या कलाविषयक जाणीवा अभावानंच समृद्ध झाल्या. मराठी आणि बंगाली माणसे पैसा कमावण्यात मागे पडली असतीलही पण त्यांनी संगीत, साहित्य, नाटक, नृत्य, विज्ञान, क्रीडा, पत्रकारिता, समाजकारण यांमध्ये स्वत:ला फार पुढे नेलं. खरी चिंता अशी आहे की मराठी माणूस बदलत चालला असून तो लग्नकार्यापासून श्रीमंतीपर्यंत मारवाडी-गुजराथी लोकांचं अनुकरण करू लागला आहे. ब्राह्मण संमेलनांतून सांगितलं जातंय की ‘स्वत:ची डेअरी काढून चितळे व्हा’. समाजाला आर्थिक उन्नतीची गरज असतेच असते पण केवळ आर्थिक उन्नती एवढंच मराठी माणसाचं कधीच लक्ष्य नव्हतं. समाजाला चितळे जसे हवे असतात तसेच पु.लं, गदिमा, कुसुमाग्रज हेही हवे असतात, आजचा आपला प्राधान्यक्रम तो आहे का? ही खरी चिंता करण्याची गोष्ट आहे.

मराठी जगवायची असेल तर फक्त मराठी दिन साजरा करून होणार नाही. दररोज आपल्याला मराठी व्हावं लागेल. त्याहीपेक्षा म्हणजे मराठी दृष्टीकोन म्हणजे काय ते नीट समजावून घ्यावं लागेल. मराठी माणूस तोच जो व्यापक विचार करतो, संकुचित नाही. ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वरांनी लिहिलं की हे विश्वचि माझे घरं I ऐसी ज्याची मती स्थिरं II किंबहुना चराचंर I आपणचि जाहलाII’ याचा अर्थं मराठी असणं म्हणजे व्यापक असणं. आपल्या भाषेतून व्यापकतेकडे जाणं म्हणजे मराठी.  मराठी असणं म्हणजे ‘विनोबा’ असणं. गीतेचं ‘गीताई’ या मराठी रुपात भाषांतर करणारे मराठी विनोबा म्हणजे केवळ मराठी नव्हे. ‘जय महाराष्ट्र’ म्हणून मराठी होणं फार सोपं आहे, ‘जय भारत’ म्हणून मराठी होणं त्यापेक्षा जरा अवघड आहे पण सगळ्यात अवघड आहे ते विनोबां सारखं ‘जय जगत’ म्हणणारा मराठी होणं. अशी माणसे घडवण्याची मराठी भूमीची ताकद असेल तर मराठीला कोणत्याच अर्थानं मरण नाही. आता प्रश्न एवढाच आहे की मराठीचा मोठा वारसा आपल्याला फक्त सांगण्यापुरता हवा की  आचरणात आणण्यासाठी सुद्धा हवा आहे? मराठीच्या चिंतेपेक्षा मराठीवर चिंतन होणं महत्वाचं आहे. मग मराठीला मरण नाही.    
      

डॉ. विश्वंभर चौधरी

1 comment: