Saturday, November 26, 2011

माननीय आर आर पाटील, राष्ट्रधर्म पाळा !

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज तीन वर्षे पूर्ण झाली. देशाला वेठीला धरणाऱ्या त्या हल्ल्यानंतर एकूणच सुरक्षा व्यवस्थेत किंवा पोलीस दलात काय बदल झाले ते आपल्या सारख्या सामान्य माणसांना कळणे अवघड आहे. खरे पाहता तीन वर्षांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एखादी श्वेत-पत्रिका अथवा साधे निवेदन काढून आपण काय काय उपाययोजना केल्या किंवा व्यवस्थेतील त्रुटी कशा दूर केल्या याचे प्रामाणिक विवरण जनतेपुढे ठेवावयास हरकत नव्हती.   उपाययोजना झाल्या आहेत मात्र लोकांना सांगितल्या गेल्या नाहीत असे असेल तर एकवेळ ठीक आहे परंतु उपाययोजना झाल्याच नसतील तर ते फार गंभीर आहे. शिवाय राम प्रधान समितीच्या अहवालाचे काय? त्यावरच्या कृती अहवालाचे काय? कृती केली असल्यास नेमकी काय कृती केली? पोलीस दलाच्या सक्षमीकरणापासून सतर्कतेच्या उपाय योजनांपर्यंत आज काय स्थिती आहे? सरकारचा या विषयी नेमका काय कार्यक्रम आहे? याबाबत महाराष्ट्र अजून अंधारात आहे (इथेही "भार नियमन"? !!).  संवेदनशील आणि गोपनीय माहिती वगळता इतर माहिती समोर आणून त्याविषयी जनतेचे प्रबोधन करणे शक्य होते. मुंबई किंवा देशाच्या इतर भागाच्या सुरक्षेसाठी नागरिकांना एक साधन म्हणून वापरले जाऊ शकते मात्र सरकारच्या कार्यक्रम-पत्रिकेवर यासाबंधीचा गंभीर कार्यक्रम दिसत नाही. अर्थात असा काही कार्यक्रम द्यायचा असेल तर त्यासाठी सरकारात गंभीर माणसे असावी लागतात.

हा हल्ला झाल्यानंतर गृहमंत्री मा. आर आर पाटील यांनी "मोठ्या शहरात अशा छोट्या छोट्या घटना घडत असतात" अशी 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे" छापाची अत्यंत बेजबाबदार प्रतिक्रिया दिली होती आणि त्यामुळे त्यांना गृहमंत्री पद सोडावे लागले. दरम्यान,  एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात अन्य कोणीच लायक उमेदवार न मिळाल्याने राष्ट्रवादीने पुन्हा त्यांनाच गृहमंत्री करून जनतेच्या जखमेवर मीठच चोळले. परवा मा.शरद पवारांवर जो हल्ला झाला त्या वेळी याच मा.आर आर पाटलांनी कधी नव्हे एवढी तत्परता दाखवून थेट केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र लिहून त्यांच्या साहेबांची सुरक्षा व्यवस्था वाढवावी असे पत्र लिहिले ! केवढी ही कार्यक्षमता ! अर्थात ही कार्यक्षमता २६/११ वेळी कुठे गेली होते असा प्रश्न आपण विचारू नये, कारण लोकशाहीत सर्व लोक समान असतात मात्र काही लोक अधिक समान असतात ! तेव्हा मोठ्या साहेबांवरील अगदी छोटा हल्ला हा छोट्या माणसांवरील मोठ्या (नव्हे त्यांचे बळी घेणारा) हल्ल्यापेक्षा आर आर पाटलांना मोठा वाटावा यात आश्चर्य ते काय? शेवटी ते राज्याचे गृहमंत्री असण्यापेक्षा राष्ट्रवादीचे निष्ठावान सैनिक अधिक आहेत हेच यातून अधोरेखित होते...आणि तसे ते का असू नये? पवारांवर हल्ला झाल्यानंतर त्यांच्यावर निष्ठा दाखविण्याची राष्ट्रवादीत जर अहमहिकाच लागत असेल तर त्यात आबांनी सामील का होऊ नये? अनेक राष्ट्रवादींच्या भावना संतप्त होत्या कारण त्यांच्या 'पितृतुल्य' व्यक्तीमत्वावर (अगदी छोटा का असेना) हल्ला झाला होता, आता त्या सामान्य, दुर्दैवी मुलांचे काय ज्यांनी  स्वतःचे प्रत्यक्ष पितृ छत्रच काहीही दोष नसतांना केवळ शासनाचा गलथानपणा झाला म्हणून २६/११ च्या हल्ल्यात गमावले? अर्थात 'पितृ तुल्य' शरद पवार साहेबांच्या हातात अनेक जणांना मंत्रीपद देण्याची ताकद आहे जी त्या दुर्दैवी, बळी पडलेल्या पित्यांच्या हाती नव्हती त्यामुळे ते बिचारे बळी पडले तेंव्हा राष्ट्रवादीच्या बड्या मंडळीना ना 'आत्मक्लेश' करायचे सुचले ना कसाबचे पुतळे जाळायचे सुचले, सुचली ती अशी बेजबाबदार प्रतिक्रिया ! आज अण्णा हजारे यांचे पुतळे जाळणांर्या शूर-वीरांनी कसाबचे पुतळे जाळण्याची भाषा कधीच केली नव्हती, हे विशेष.

गृहमंत्री म्हणून आता राजधर्म पाळणे आणि सामान्य माणसांच्या सुरक्षेलाही महत्व देणे ही मा.आर आर पाटील यांची घटनादत्त जबाबदारी आहे. सुरक्षा आणि पोलीस दलात काय सुधारणा झाल्या ते तर त्यांनी सांगावेच, मात्र घटनेने निर्धारित केलेल्या कर्तव्यांचे पालन करून त्यांनी राजधर्म पाळावा याची त्यांना आठवण करून द्यावीशी वाटते. तीन वर्षात काय घडले तर पोलीस पूर्वीसारखेच साधन-हीन, जनता तेवढीच असुरक्षित आणि अजमल कसाब जो पूर्वी पाकिस्तानात रुखी-सूखी रोटी खावून कसेबसे जगत होता त्याच्या चमचमीत बिर्याणी खाण्याची आयुष्यभराची सोय एवढाच एक २६/११ च्या हल्ल्याचा शेष-विशेष असे मात्र होऊ नये. महाराष्ट्राची सुरक्षा हा गंभीर विषय असून तो गृहमंत्र्यांनी गांभीर्याने हाताळायचा आहे. आबांनी राजधर्म पाळण्याची मनापासून प्रतिज्ञा केली तरी २६/११ च्या हुतात्म्यांना वेगळी श्रद्धांजली वाहण्याची गरज उरणार नाही !