Saturday, July 18, 2015

नारायण मूर्तीचं काय चुकलं?


नारायण मूर्ती यांनी आपल्या देशातील संशोधनाच्या स्थितीवर केलेल्या विधानावर सध्या सोशल मिडियामध्ये जोरदार चर्चा चालू आहे. मला वाटतं त्यांचं विधान सरसकट न घेता तारतम्यानं घ्यायचं विधान आहे. संशोधनाचं अंतिम उद्दीष्ट पीएचडीची पदवी असं आपल्याला म्हणायचं असेल तर देशात गरजेपेक्षा खूपच जास्त संशोधन झालंय असं म्हणावं लागेल पण जगाला एक पाऊल पुढे नेणारी किती संशोधनं आम्ही केली असा प्रश्न जर मूर्तींना पडला असेल तर त्यावर चिंतनाची गरजच आहे यात शंका नाही.

पहिला मुद्दा म्हणजे विज्ञानात महासत्ता होण्याची स्वप्ने रंगवणार्या देशात संशोधनावरची अर्थसंकल्पीय तरतूद एक टक्क्या पेक्षाही कमी असते त्यामुळं संशोधन ही आपला प्राथमिकता कधीच नव्हती असं म्हणावं लागेल. विद्यापीठांमधून जे चालतं त्याला संशोधन म्हणणं म्हणजे हरभजनला कसलेला फलंदाज म्हणल्यासारखं आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे संशोधनाची भारताच्या संदर्भातील प्रस्तुतता. आज आपल्याला सांगितलं जातंय की जैतापूर सारखे अणुप्रकल्प आवश्यकच नाही तर अनिवार्य आहेत अन्यथा देशात ऊर्जा संकट ओढवेल! सौर ऊर्जा फार महाग आहे म्हणून ती परवडत नाही. मुद्दा खरा आहे पण तितकाच विसंगत आहे. या देशावर दहा महिने सूर्याचं राज्य असतं. सौरऊर्जा आपल्याला निसर्गानं मुबलक उपलब्ध करून दिली आहे. गेल्या सदुसष्ट वर्षात अनेक ठिकाणी अनेक सरकारं आली आणि गेली, त्यांनी खूप संशोधन संस्था काढल्या (पुण्यात तर चक्क कोंबडीचे अंडे कसे उबवायचे यावर संशोधन करणारी संस्था वाकडेवाडीत आहे!) पण देशाला मुबलक उपलब्ध असलेल्या सौरऊर्जेवर संशोधन करणारी एकही मोठी संस्था देशात उभी राहू शकली नाही! तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य असं असतं की ते संशोधनातून स्वस्त होत रहातं. १९९६ च्या आसपास मोबाईल फोन आले तेव्हा फक्त श्रीमंतांना परवडतील अश्याच त्यांच्या किंमती होत्या. बाजारपेठ वाढवायची म्हणून कंपन्यांनी त्यावर संशोधन केलं आणि जसे महागडे मोबाईल बाजारात आले तसेच स्वस्तात स्वस्त मोबाईल फोन देखील आले आणि आज अगदी घरकाम करणाऱ्या बाईला देखील मोबाईल फोन परवडतो. सौरऊर्जेवर संशोधनासाठी देशांम व्यवस्था केली असती तर आज सौरऊर्जा देखील खूप स्वस्त राहिली असती. हे संशोधन आपणच करणं गरजेचं होतं, साहेब संशोधन करणार नव्हताच कारण त्याच्या देशातून सूर्य नेहमीच गायब असतो! आपण संशोधन केलं नाही, अजूनही करत नाही आणि मग अणुऊर्जे सारखी महाग ऊर्जा ‘इतर ऊर्जा साधनांच्या तुलनेत स्वस्त’ म्हणून विकत घेण्याचं समर्थन करतो.

तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा असा की विज्ञान, संशोधन हा आपल्या समाजाच्या अजेंड्यावरचा विषय आहे का? आपल्या समाजात वैज्ञानिक अस्मिता तयार झाल्यात का? प्रश्न असा आहे की आपल्या समाजाला फक्त जातीय, धार्मिक, भाषिक किंवा प्रांतीय अस्मिताच का असाव्यात? वैज्ञानिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, पर्यावरण-विषयक अस्मिता का नसाव्यात? उदाहरणार्थ भारताच्या आण्विक कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा यांच्या मुंबईतील बंगल्याचा लिलाव किती बिनबोभाट झाला! कल्पना करा, हीच वास्तू शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, सावरकर, मौलाना आझादांच्या मालकीची असती तर? महाराष्ट्रात या लिलावावरून मुडदे पडले असते! पण आम्हाला वैज्ञानिक अस्मिताच नसल्यानं या वास्तूच्या लिलावाला फारच माफक वृत्तपत्रीय विरोध तेवढा काय तो झाला. होमी भाभा, सी व्ही रमण, जगदीशचंद्र बोस आमच्या अस्मितेचे विषयच नाहीत! धृपद गायक उस्ताद सईदुद्दिन डागर यांना पुण्यात स्वत:चं घर सुद्धा नसणं हा समाजाच्या जाणीवांचा भाग बनतच नाही कधी, पण उद्या परदेशातल्या कोणी जर धृपद संगीतावर टीका केली तर मात्र आम्ही लगेच टीका करणाऱ्याचे पुतळे जाळू. एखाद्या शाळेला एखाद्या जातीच्या राष्ट्र्पुरुषाचं नाव द्यावं म्हणून जो समाज रस्त्यावर येतो त्या समाजाला त्याच शाळेत शिक्षणाच्या चाललेल्या हेळसांडीसाठी रस्त्यावर यावं असं मात्र चुकून वाटत नाही! आसपासच्या निसर्गाचा कितीही विध्वंस कोणी केला तरी आमच्या पर्यावरणीय अस्मिता जाग्या होत नाहीत कारण त्या अस्मिता कधी तयारच झाल्या नाहीत.

चौथा मुद्दा संख्यात्मक आहे. जर्मनी-फ्रान्स सारख्या देशांचे आकारमान, लोकसंख्या आणि आपल्या देशाची लोकसंख्या, आकारमान यांची तुलना करायची आणि नंतर त्या छोट्या छोट्या देशात विज्ञानात नोबेल मिळवणारे शास्त्रज्ञ किती आणि आपल्या देशात किती असा प्रश्न स्वत:ला विचारला तर भारतीय म्हणून आपण खजील होऊ! वर्षानुवर्षे धर्म आणि संस्कृतीच्या संवर्धनात आमच्या पिढ्याच्या पिढ्या वाया गेल्या आणि विज्ञान संशोधनात आपण खूपच मागे राहिलो हे नाकारून चालणार नाही. आता इथं कोणी कृपया आमचा सर्वरोगहारी आयुर्वेद, आर्यभट्टानं लावलेले शोध वगैरे प्रतिवादात मांडू नयेत कारण ही पोस्ट वर्तमानकाळाशीच संबंधित आहे !
(काही भाग दै. दिव्य मराठीत पूर्वप्रकाशित)

Saturday, July 11, 2015

लेख क्र १३। -पण ही शाळा आडवी आली....!



राज्यातील सगळी शाळाबाह्य मुलं म्हणजेच शाळेत न जाणारी मुलं यांचं एकाच दिवसात राज्यभर सर्वेक्षण करण्याचा चांगला उपक्रम राज्य सरकारनं गेल्या आठवड्यात हाती घेतला. या सर्वेक्षणात अर्थात अनेक त्रुटी राहिल्या असल्या तरी सर्व शिक्षा अभियान, शिक्षणाचा अधिकार यासारखे व्यापक उपाय योजूनसुद्धा शिकू न शकणाऱ्या मुलांच्या प्रश्नावर चर्चा सुरु झाली ही अभिनंदनीय गोष्ट आहे. आपल्याकडे शिक्षणावर होणारी अर्थसंकल्पीय तरतूद खूपच कमी असते इथपासून ते सरकारी, खाजगी संस्थांमधील गैरकारभाराबाबत अनेक बाबीवर बोलले जाते तथापि काही मुलभूत मुद्द्यांची चर्चा मात्र अभावानेच दिसते ते मुद्दे म्हणजे शिक्षणाचे कालसुसंगत प्रयोजन काय? आजच्या शिक्षण पद्धतीचा मुळापासून विचार करायची वेळ आली आहे का? पुढच्या काळात शिक्षण हे फक्त शाळा-कॉलेजातून होईल की सोशल मिडीया लोकांना अधिक शिक्षण देईल? शेवटच्या मुद्द्यावर विचार करावा लागणार आहे तो अशासाठी की केंद्र सरकारच्या २०११ च्या जनगणना अहवालात एक अशी माहिती समोर आली की दहा टक्क्यांपेक्षा जास्त लोक असे आहेत जे शैक्षणिकदृष्ट्या निरक्षर पण मोबाईल साक्षर आहेत! म्हणजेच पारंपारिक शिक्षणापेक्षा मोबाईल हा साक्षरतेकडे जाण्याचा अधिक सुलभ मार्ग असावा! किंवा दुसऱ्या पद्धतीने सांगायचे तर प्रौढ साक्षरता मोहिमा आपल्याकडे वर्षानुवर्षे चालूनसुद्धा जे साध्य झाले नाही ते मोबाईल स्वस्त झाल्याने साधले. मोबाईल म्हणजे तंत्रज्ञान आणि समाजाला ज्ञानापेक्षा तंत्रज्ञान अधिक आकर्षित करते हा या सर्वेक्षणाचा संदेश आहे. असे असेल तर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येईल याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. परंतु लोक मोबाईल साक्षर झाले म्हणजे ते शिक्षित होतील असे नाही. साक्षरता आणि शिक्षितता यात खूपच फरक आहे. 

तक्षशीला आणि नालंदा या पुरातन विद्यापीठांच्या काळात शिक्षणाचे प्रयोजन काय होते? त्यावेळची एकूण उपजीविकेची साधने शिक्षणावर अवलंबून नव्हती. शेती करण्यासाठी शिक्षणाची म्हणजे विद्यापीठीय शिक्षणाची गरज नसते. आधुनिक काळातील पदव्या आणि नोकरी हेही प्रयोजन त्याकाळी असण्याची शक्यता नाही. ही विद्यापीठे उभी राहण्याचे एकमेव प्रयोजन ज्ञानसाधना, ज्ञाननिर्मिती हेच होते. भारतात त्यानंतरच्या काळात शिक्षणाचा प्रसार हा त्या काळातील लोकांना हिशेब वगैरे व्यावहारिक उपयोगिता यापुरताच मर्यादित होता. पुढे इंग्रज आमदनीत शिक्षणाला ज्ञानासोबत प्रतिष्ठेशी जोडले गेले. विलायतेला जाऊन बॅरिस्टर होऊन येणे हे बुद्धीवैभवाच्या प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले. स्वातंत्र्योत्तर भारतात शिक्षणाचे प्रयोजन ज्ञान, प्रतिष्ठा यापेक्षा जगण्याचे साधन म्हणून अनिवार्य बनलेल्या पदवी आणि नोकरीकडे सरकले. पायलीच्या पन्नास पदव्या आपण निर्माण केल्या आणि पदव्या विकत मिळण्याची सोयपण केल्यामुळे पदव्यांची प्रतिष्ठा गेली. लोकसंख्या एवढी भरमसाठ वाढत गेली की ज्ञान हे शिक्षणाचे प्रयोजन न राहता नोकरीच्या गळेकापू स्पर्धेतील आवश्यक साधन एवढीच शिक्षणाची पत शिल्लक राहिली. संशोधनाला म्हणावा तसा राजाश्रय नसल्याने संशोधनाची जिज्ञासा संपली आणि शोध लावण्यापेक्षा पी.एचडी. पदवी मिळवणे अधिक महत्वाचे आहे असा समज दृढ झाला. त्यानंतर शिक्षणात अजून एक विचार प्रवाह आला जो असे म्हणत होता की पुढच्या काळात व्यावसायिक कौशल्य महत्वाचे आहे, शिक्षण नाही. पोट भरायला उपयोगी पडते तेवढेच शिक्षण म्हणजे खरे शिक्षण असा आशय रूढ झाल्यावर स्वान्तसुखाय शिक्षण किंवा ज्ञानार्जनासाठी शिक्षण ही संकल्पना मागे पडून शिक्षणात निखळ उपयुक्ततावाद आला.  आजच्या आपल्या शिक्षण व्यवस्थेचा डोलारा हा उपयुक्ततावाद, नोकरीच्या उपलब्धतेची स्पर्धा जिंकण्याची इर्षा, अर्थार्जन इतक्या मर्यादित उद्देश्यांसाठी उभा आहे. देशात माहिती तंत्रज्ञानात लाखो अभियंते उपलब्ध आहेत पण प्राथमिक शाळेत शिकवायला चांगले शिक्षक मिळत नाहीत, जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र अशा आधुनिक विज्ञान शाखांमध्ये बेरोजगारी निर्माण व्हावी एवढे उच्चशिक्षित तरुण पण दुसरीकडे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या मूलभूत ज्ञानशाखेत संशोधन करण्यासाठी विद्यार्थीच मिळत नाहीत अशा अनेक विसंगतींना आपण आज तोंड देत आहोत. त्यामुळे शिक्षणाच्या प्रयोजनापासूनच आपल्याला विचार करावा लागेल. 

स्पर्धात्मक वातावरणामुळे आपली शिक्षण व्यवस्था अशी झाली की ती विद्यार्थ्याच्या बुद्धीला ‘पेस’ (वेग) देते पण ‘स्पेस’ (अवकाश) देत नाही. विचार करण्याएवढा वेळ देणे स्पर्धेच्या युगात अशक्य झाले आहे. पालकांना या स्पर्धा रोगाने इतके पछाडले आहे की मुलगी असेल तर तिने लता मंगेशकरच व्हावे आणि मुलगा असेल तर सचिन तेंडूलकरच या विचाराने कोवळ्या कळ्यांचे फुलात रुपांतर होईतो नैसर्गिक क्रमाने वाट पाहण्याची पालकांची तयारी नाही! वाट्टेल ते करून त्यांना आपल्या मुलांना लवकरात लवकर यशस्वी आणि प्रसिद्ध झालेले पहायचे आहे.  सध्या चॅनेलवर छोट्या छोट्या मुलांना संगीत अथवा नृत्यस्पर्धांसाठी ज्या पद्धतीने वेठीला धरले जाते ते अक्षरश: बघवत नाही. यासाठी चॅनेलवाल्यांचा बाजारूपणा जेवढा जबाबदार आहे तेवढाच मुलांना वेठीला धरून यशस्वी करून दाखवण्याचा पालकांचा अट्टहास देखील जबाबदार नाही का? पालक का आपल्या मुलांना क्लासेस आणि छंदवर्ग यांचा अक्षरश: मारा करून कुठे णा कुठे यशस्वी करण्याच्या घाईत आहेत? न्यूटनच्या आईने त्याला सकाळी कत्थकचा, दुपारी चित्रकलेचा संध्याकाळी टेनिसचा क्लास लावला असता तर न्युटनच्या बुद्धीला झाडावरून खाली पडणाऱ्या फळाला बघण्याइतकासुद्धा निवांतपणा मिळाला नसता, त्यावर विचार करून संशोधन करणे तर पुढची गोष्ट! संशोधन असो की ज्ञानवृद्धी, त्यासाठी मेंदूला स्वत:चा अवकाश असावा लागतो, मेंदूमध्ये सर्जनशीलता निर्माण व्हायची असेल किंवा सर्जनशीलतेला थोडे हातपाय पसरायचे असतील तर मेंदूत काही रिकामी जागा शिल्लक असावी लागेल. आम्ही मुलांच्या मेंदूत यशस्वी होणे एवढ्या एका इप्सितासाठी इतके काही भरून ठेवत आहोत की पुढच्या पिढीची उपजत सर्जनशीलता अंग चोरून बसली आहे. तात्पर्य आपल्या आजच्या शिक्षण व्यवस्थेतून न्यूटन, आईन्स्टाईन तयार होण्याची सुतराम शक्यता नसून अतिशय उच्च दर्जाचे गुण मिळवणाऱ्या होतकरू पण सुशिक्षित बेकार तरुणांचे जत्थे वर्षागणिक तयार होत आहेत.   

मला शाळेत असल्यापासून नेहमीच प्रश्न पडत आला आणि आजही ज्या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नाही तो प्रश्न म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास-भूगोल हे सहाच विषय सगळ्यांनी प्राथमिक-माध्यमिक शिक्षणात शिकले पाहिजेत अशी सक्ती का आहे? माणसाच्या अंगीभूत कलाकौशल्याला आपली व्यवस्था ‘शिक्षण’ का समजत नाही? म्हणजे उदाहरणार्थ खेड्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला फाडफाड इंग्रजी बोलता येत नाही आणि शहरात कॉन्व्हेंटमध्ये शिकणारा विद्यार्थी फाडफाड इंग्रजी बोलू शकतो. त्याउलट पर्यावरणाच्या सोबत राहिल्याने गावातील विद्यार्थी झाडावर पटकन आणि सहजपणे चढू शकतो जे शहरातील विद्यार्थ्याला परिस्थितीमुळे अवगत नाही. दोघे जंगलात गेले आणि समोरून वाघ आला तर कोण वाचण्याची शक्यता जास्त आहे? पटकन झाडावर चढणारा की फाडफाड इंग्रजी बोलणारा? झाडावर चढू शकणारा वाचायची शक्यता जास्त असेल तर मग आपण तेही शिक्षण आहे हे मान्य का करू नये? वर्षभरापूर्वी केरळात गेलो असता कळले की झाडावरून नारळ काढणाऱ्या लोकांच्या अभावी अनेकांना नारळ झाडावरच सडू द्यावे लागत आहेत आणि दुसरीकडे उत्पादन कमी झाल्यामुळे नारळ महाग होत आहेत. मुद्दा असा की व्यावसायिक कौशल्यावर आधारित शिक्षण देऊनही बेरोजगारी कमी होत नसेल तर आपण खरी गरज कुठे आहे ते न ओळखताच शिक्षण देत आहोत का यावरही विचार व्हावा. 

‘शाळाबाह्य’ मुलांना शोधून शाळेत घालणे चांगले आहे मात्र ही मुले पुढे ‘व्यवस्थाबाह्य’ ठरू नयेत कारण विशेषत: ग्रामीण भागातील शिक्षणाची अवस्था किती वाईट आहे हे आपण वेगवेगळ्या अह्वालांमधून बघतोच आहोत. सहावी इयत्तेतील मुलाला दुसरीचे पुस्तक वाचता येत नसेल आणि नववीतील मुलाला साध्या इंग्रजी शब्दाचे स्पेलिंग जुळवता येत नसेल तर सगळी मुले शाळेत आल्याने तरी काय साध्य होणार आहे? परीक्षा सोप्या करून, कॉप्या करायला मुक्त वाव देऊन आपण निकाल वाढवू शकतो पण गुणवत्ता नाही वाढवू शकत; आणि गुणवत्तेशिवाय शिक्षण व्यर्थ आहे. 

मार्क ट्वेन असं म्हणालाच आहे  की ‘खरं म्हणजे मला खूप शिकायचं होतं पण ही शाळा आडवी आली!’  आपण कदाचित पुढच्या काळात मार्क ट्वेनला अधिकच सुसंगत बनवू अशी चिन्हे आहेत. तसे होऊ द्यायचे नसेल तर आपल्या शिक्षणव्यवस्थेला काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे आधी शोधावी लागतील. 

(पूर्वप्रकाशन-  दै  दिव्य मराठी, समाजभान सदर १२ जुलै २०१५)