Thursday, December 29, 2011

आम्ही निराश नाही, भ्रम निरास झाल्याने दु:खी जरूर आहोत...!

२७ डिसेम्बर रोजी लोकपाल विधेयक संसदेने (की युपीएने?) संमत केले त्याबरोबरच कडक लोकपाल कायदा येण्याच्या सर्व आशा मावळल्या! सीबीआय जेवढ्या तक्रारी पुढे सरकवील तेवढ्याच तक्रारींची चौकशी लोकपाल करू शकतो, त्यातही लोकपाल फक्त जुजबी प्राथमिक चौकशीच करू शकतो, त्यानंतर लोकपालने पुन्हा चौकशी सीबीआय अथवा केंद्रीय दक्षता आयोगाकडे वर्ग करायची, चौकशीअंती कुठले कलम लावून गुन्हा दाखल करायचा हे देखील सरकारी नियंत्रणातील या दोन संस्थांनी ठरवायचे आणि लोकपालने त्यावर फक्त मोहर लावायची! असा हा अजब कायदा असेल. भ्रष्टाचारी व्यक्तीला शिक्षा होणे तर दूरच, चौकशी सुद्धा धड होण्याची शक्यता नाही. लोकपालला संपूर्ण अधिकार का दिले नाहीत? संवैधानिक दर्जा कशासाठी हवा? कॉर्पोरेट क्षेत्राला ऐन वेळी का वगळले? एनजीओ आणि माध्यमांना का वगळले? कडक तरतुदी करण्यास सरकारचा विरोध कशासाठी आहे? कम्युनिस्ट आणि भाजप यांनी सुचविलेल्या सर्व दुरुस्त्या बहुमताच्या जोरावर फेटाळून देशातील गोरगरिबांची, अडवणूक होणाऱ्यांची घोर निराशा का केली? अखेर देशाची एवढी मोठी फसवणूक कोणत्या कारणासाठी केली? या प्रश्नांची उत्तरे आत्ता दिली नाहीत तरी योग्य वेळी देश याचा जाब सत्ताधारी पक्षांना नक्कीच विचारील.


दोन दिवसांचे अण्णांचे उपोषण संपले असले तरी लढा संपलेला नाही. मी शुक्रवारी (२३ डिसेम्बर) संध्याकाळी राळेगणला होतो. त्यादिवशी अण्णांना ताप आणि खोकल्याचा त्रास होत होता. त्यानंतर पुढचे तीन दिवस ते प्रकृतीच्या कारणामुळे जेवलेही नव्हते आणि त्यातच लगोलग २७ पासून त्यांचे उपोषण सुरु झाले. अशा परिस्थितीत अण्णांनी उपोषण करू नये असे प्रत्येकालाच वाटत होते मात्र अण्णा ठाम होते. २७ रोजी उपोषणाच्या पहिल्याच दिवशी सर्वांनीच अण्णांना उपोषण करू नका अशी विनंती केली होती. अखेर राळेगण सिद्धीच्या लोकांच्या विनंतीला यश आले आणि अण्णांनी उपोषण सोडले अन्यथा अण्णांच्या तब्येतीवर वाईट परिणाम होणे अटळ आहे; यावर डॉक्टरांचे एकमत होते. अशा असाधारण शारीरिक परिस्थितीत अण्णांना उपोषण सोडावे लागले मात्र त्यातही काही जणांना केवळ राजकारण आहे असे भासले! गर्दी कमी होती म्हणून उपोषण सोडायचा निर्णय घेतला गेला असा अपप्रचार करण्यात आला, मात्र हे खरे नाही. गर्दी पहिल्या दिवशी कमी होती हे खरे मात्र दुसऱ्या दिवशी ती वाढत होती. जंतरमंतरवर असेच झाले होते आणि दुसऱ्या दिवशी गर्दी होणे वाढले होते याचा मी साक्षीदार आहे. असे असतांना गर्दी झाली नाही, अण्णांची जादू संपली, आंदोलन संपले अशा हाकाट्या पिटल्या गेल्या हे योग्य नाही. कार्यकर्त्यांनी यामुळे संभ्रमित होऊ नये आणि विचलीतही होऊ नये. लडाई जारी है, जारी रहेगी ! आम्ही निराश मुळीच नाही मात्र सरकारच्या आडमुठेपणांमुळे आमचा भ्रम निरास होऊन घोर फसवणूक झाल्याने दु:खी जरूर आहेत. निदान शेवटच्या क्षणी सरकार आडमुठेपणा सोडून जनतेच्या हिताचे काही करील अशी पुसट आशा वाटत होती मात्र ती फोल ठरली.

आता अधिक मोठा लढा उभारून पुन्हा एकदा शक्ती एकवटावी लागेल. ...संपूर्ण ताकदीनिशी आणि सत्य, अहिंसेची कास न सोडता. आत्तापर्यंत ज्या ईश्वराने आपल्याला या लढ्यासाठी शक्ती दिली तोच ईश्वर पुन्हा आपल्याला शक्ती देईल. तूर्तास अण्णांना तब्येत सुधारण्यासाठी शुभेच्छा देऊ या आणि मनातील मरगळ झटकून पुन्हा एकदा मोठ्या लढ्यासाठी लवकरच सज्ज होऊ या...सत्य परेशान होता है, पराभूत नहीं ! जय हिंद...! वंदे मातरम...!