Friday, October 21, 2011

सावधान! ...दिवस हल्लेखोरांचे आहेत....

१२६ वर्षांची महान परंपरा लाभेल्या महान कांग्रेसचे महान नेते मनिष तिवारी यांनी महाराष्ट्रातील काही महाभ्रष्ट महाभागांच्या नादी लागून अण्णांवर केलेले आणि नंतर सपशेल माफी मागून परत घेतलेले आरोप, शांतीभूषण यांची बनावट सीडी प्रकाशित करून अशी कागाळी करणांरांचेच उघडे पडलेले पितळ, प्रशांत भूषण यांच्यावर “त्रयस्थामार्फत” करवून घेतला गेलेला हल्ला, अरविंद केजरीवाल यांच्याकडे सरकारी थकबाकी असल्याचे भासवित त्यांना बदनाम करण्याचे केलेले प्रयत्न, त्यांच्यावर केलेली चप्पलफेक या सर्व नौटंकीचा आणखी एक एपिसोड म्हणजे काल किरण बेदी यांच्यावर झालेला “भ्रष्टाचाराचा”आरोप...अरविंद केजरीवाल यांच्यावर चप्पल फेकून मारणारा जितेंद्र पाठक आणि किरण बेदी यांच्यावर एक बातमी पेरून चळवळीला लक्ष्य करणारांचे “लक्ष्य” सारखेच आणि ते म्हणजे आंदोलनाला मागे खेचून आपल्या “धन्याचे” हित साधायचे...हा नवा (खरेतर फार जुना) काँग्रेसी “चमचे संप्रदाय”! या संप्रदायाचे तत्वज्ञान “बेजबाबदार, बेदरकार टीका करून राष्ट्रीय चळवळीला कसे संपविता येईल” या एका आणि एकाच महान तत्वज्ञानावर आधारलेले आहे. असे नसते तर किरण बेदींचा एवढा मोठा (!) भ्रष्टाचार (?) बाहेर आणल्याचे नुसते समाधान मिळवीत बसण्यापेक्षा “त्यांनी” बेदींवर गुन्हा दाखल करून भ्रष्टाचाराच्या लढाईत आपणही मागे नाही हे दाखवून दिले असते; परंतु असे काही झाले नाही. गांधी-नेहरू घराणे असे नुसते नाव निघाले तरी “घालीन लोटांगण, वंदिन चरण” अशी ज्यांची भक्ती उचंबळून येते अशा देशभक्त भाटांकडून आपण तरी अपेक्षा का करावी? जन-आंदोलनांचा तेजोभंग करणे आणि मी सोडून सगळे जग कसे मूर्ख आहे हे ठसविण्यासाठी बोरू झिजविणे हाच तर त्यांचा राष्ट्रधर्म आहे....

आंदोलनाचा पुढील काळ परीक्षेचा असून टपून बसलेल्या अशा अनेक हल्लेखोरांना आपल्याला यापुढे तोंड द्यावे लागेल. संयम न सोडता, बौद्धिक, वैचारिक पातळी न सोडता, कार्यावरील निष्ठा न सोडता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या भारतीयांचा संपूर्ण विश्वास सांभाळत आपल्याला हा सामना करावा लागेल. “टीम अण्णा”च्या कसोटीचा हा क्षण आहे आणि हे आव्हान पेलण्याची क्षमता या संघात आहे. स्वतः अण्णा, मेधाताई, अरविंदभाई, हेगडेजी, शांतीभूषणजी, प्रशांत भूषणजी अशा सर्वांवरचीच जबाबदारी वाढली असून या सर्व अग्निदिव्यातून आंदोलन तावून सुलाखून बाहेर पडेल याबाबत शंका नसावी. प्रभावी जनलोकपाल कायदा हेच आपले (सध्या तरी) एकमेव लक्ष्य असून त्यानंतरची लढाई फार दीर्घकालीन अशी असणार आहे. पहिल्या टप्प्यात कायदा, दुसऱ्या टप्प्यात व्यवस्था परिवर्तन आणि त्यानंतर शेवटच्या तिसऱ्या टप्प्यात प्रबोधन असे या लढाईचे तीन दीर्घ टप्पे आपल्याला पार करायचे आहेत.

***