Sunday, January 1, 2012

वर्तमानपत्रांनी पत्रकारितेचा धर्म सोडू नये

काल सजग नागरिक मंच तर्फे आयोजित व्याख्यानात मी काही केलेली आणि काही न केलेली विधाने छापून आलेली आहेत. मी मुंबईतील आंदोलन फसले असे कधीही बोललो नाही, तरीही मी तशी कबुली दिली, ‘घरचा आहेर’ दिला वगैरे मथळे पाहून मी स्वतःच आश्चर्यचकित झालो. त्यामुळे कुठलाही गैरसमज होऊ नये यासाठी मी हा खुलासा मुद्दाम करीत आहे.

... सजग नागरिक मंचाने आयोजित केलेले कालचे व्याख्यान खुले होते आणि त्यात म...ुख्यत: श्रोत्यांमध्ये कार्यकर्ते जास्त संख्येने होते, इंडिया अगेन्स्ट करप्शन तसेच भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे कार्यकर्तेही तेथे उपस्थित होते आणि माझ्या व्याख्यानात काहीही आक्षेपार्ह आहे असे कुठल्याही कार्यकर्त्याला वाटले नाही, वर्तमानपत्रांना वाटले, हे विशेष.

आत्मपरीक्षणाच्या विषयी मी “आम्हाला आत्मपरीक्षण करावे लागेल” असे शब्द वापरले यावरून “टीम अण्णाने” आत्म परीक्षण करावे असा सल्ला मी दिला हा निष्कर्ष एकांगी आहे. टीम अण्णाना सल्ला देण्या एवढा मी मोठा नाही. माझा उल्लेख काही वर्तमान पत्रांकडून “कोअर कमिटी मेम्बर” असाही केला गेला, मी कधीही कोअर कमिटीचा सभासद नव्हतो आणि नाही.

हे व्याख्यान एकूण १ तास २० मिनिटे झाले आणि त्यातील १ तास १० मिनिटे मी चळवळीच्या यशाबद्दल, फलश्रुतीबद्दल बोललो. दुर्दैवाने काही वर्तमानपत्रांचा अपवाद वगळता कुणीही यातील एक ओळही छापली, मी या चळवळीची केलेली सकारात्मक समीक्षा (एकूण ८० मिनिटांच्या व्याख्यानातील ७० मिनिटे!) वर्तमानपत्रांना छापावी वाटू नये आणि शेवटची १० मिनिटे मी काही आत्मपरीक्षणपर बोललो ते मात्र मोठे मथळे देऊन छापून यावे हे अत्यंत एकांगी आणि चळवळीबद्दल आकस दाखविणारे आहे. वर्तमानपत्रांनी मुख्य आशय छापावा, व्याख्यानातील सर्व बाजू छापाव्यात ही अपेक्षा गैर नाही मात्र असे घडले नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

चळवळीतील सहकाऱ्यांचा, चळवळीला पाठिंबा देणार्या लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून मी मुद्दाम सांगतो की अण्णांच्या चळवळीचा मी एक सामान्य सैनिक आहे आणि यापुढेही राहीन, या चळवळीशी प्रतारणा करण्याची कल्पनाही मला शिवू शकत नाही. चळवळीत उत्तरोत्तर सुधारणा व्हाव्यात याची तळमळ मी बाळगतो मात्र कुठल्याही परिस्थितीत या चळवळीपासून मी लांब जाणार नाही. आदरणीय अण्णांच्या बद्दल माझा आदर तसूभरही कमी झालेला नाही आणि अण्णांच्या सर्व निर्णयांची आदरपूर्वक अंमलबजावणी करणे हेच मी आद्य कर्तव्य समजतो. आदरणीय अण्णांनी आयुष्यभराच्या त्याग आणि तपश्चर्येतून जे अलौकिक यश मिळविले आहे त्याला आमच्या वागण्या-बोलण्याने कुठेही कमीपणा येईल असे वर्तन आमच्यातील कोणीही कार्यकर्ता कधीही करणार नाही अशी ग्वाही देऊन हा खुलासा संपवतो.

डॉ. विश्वंभर चौधरी