Tuesday, December 25, 2012

अटल बिहारी वाजपेयी.......


भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आज नव्वदाव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात एकमेव पूर्ण काळ चाललेले बिगर कॉंग्रेस सरकार अटलजींनी चालविले. मला अटलजी जास्त भावले ते नव्वदीच्या दशकातले किंवा त्या आधीचे...तरुण, तडफदार अटलजींचे पहिले भाषण मी वयाच्या चौदाव्या वर्षी (१९८५, मला नीट आठवत असेल तर) औरंगाबाद येथे ऐकले. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक आणि तत्कालीन (चांगल्या!) कॉंग्रेस मधील कार्यकर्ते मात्र त्यांना वाजपेयींचे व्यक्तिमत्व आणि भाषण फार आवडे, त्यामुळे फार लहानपणापासूनच मी अटलजीं बद्दल ऐकून होतो. संध्याकाळी ७ वाजताची सभा होती, धोती आणि नेहरू सदरा (किंवा लखनवी झब्बा असावा) अशा अस्सल भारतीय वेशात अटलजी स्टेजवर आले...मेरे भाईयो और बहनो...धीरगंभीर खर्जात भाषणाची सुरुवात आणि मग पुढचा दीड तास कसा गेला कळलंच नाही....माझ्यासारख्या नववीतल्या मुलापासून सभेतल्या सर्वात विद्वान माणसापर्यंत सर्वजण अक्षरश: स्तब्ध होऊन भाषण ऐकत होते....हा प्रसंग मनात आजही ताजा आहे.   

अटलजींची अनेक भाषणे मी पुढल्या काळात ऐकली. ते मला भाषणातले पं. भीमसेन जोशीच वाटले.. पंडितजींची मैफिल जसे पडल्याचे ऐकिवात नाही तसेच अटलजींचे भाषण पडल्याचे ऐकिवात नाही! दैवदत्त मधुर पण गंभीर आवाज, भारदस्त शब्द-योजना, भाषणात एकाच पट्टीतील खालच्या ‘सा’ पासून वरच्या षड्जा पर्यंत लीलया आणि समयोचित फिरणारा गळा, एखाद्या गवयालाही साधणार नाही असा खर्ज, चेहऱ्यावर अत्यंत समर्पक हावभाव अन् अतिशय परिणामकारक तरीही पूर्णत: सहजभाव असलेले हातवारे, वाक्याची लय वाढली की होणारी डोळ्यांची उघडझाप आणि वाक्याच्या शेवटी डोळे मिटून गाठली जाणारी सम, एखादा ख्याल चालला आहे असे वाटावे अशी लय, विलम्बितातून द्रुत मध्ये गेले तरी मात्रांचा मेळ समेवर आले की मोजून घ्यावा....विराम (पॉज) घेण्याची पद्धत अशी की कदाचित आणखी एखाद्या मागच्या किंवा पुढच्या शब्दावर हा विराम चाललाच नसता, तो इथेच हवा अशी श्रोत्याची खात्री व्हावी..आशय आणि अभिव्यक्ती दोन्हींनी संपन्न असलेलं असं भाषण जगातील फारच थोडे वक्ते करू शकतात...गांभीर्य, संकीर्णता, प्रसंगावधान, विनोद, मिष्कीलपणा, खोडकरपणा, कठोराघात वज्राघात, वाणी माधुर्य अशी उत्तम वक्त्याला लागणारी सर्व शस्त्रे अटलजींच्या भात्यात स्वत; होऊन हजर असत...वक्ता दशसहस्त्रेषु, नव्हे, दश कोटीषु म्हणजे अटलजी.......

भाषणात बोचरी टीका असेल पण ‘वार’ करणं अजिबात नाही. सुसंस्कृतता आणि शालीनता यांनी ओतप्रोत भरलेलं अन्य भाषण करणं सोपं आहे पण “राजकीय” भाषण करणं अवघड, पण ते त्यांना लीलया साधत आलं. सभ्यतम भाषेत कठोरतम टीका कशी करायची याचा वस्तुपाठ म्हणजे अटलजी..राजकीय भाषणातही अलंकारिक शब्द वापरता येतात, विद्वत्ता देखील सरळ सोप्या पण परिणामकारक शब्दात व्यक्त होऊ शकते, या दोन्ही गोष्टी त्यांच्या भाषणात दिसत. आधी बोलणारा वक्ता कोणीही असो, त्याच्या भाषणाचा प्रभाव अटलजींचे भाषण सुरु झाले की २-३ मिनिटात संपलाच म्हणून समजावे. एखादा हुकमी घोडेस्वार ज्याप्रमाणे लगाम हातात घेताच घोड्यावर लगेच नियंत्रण करून घोडा अक्षरश: आपल्या ताब्यात ठेवतो, तसे अटलजी सभा आपल्या ताब्यात ठेवत.
संसदेत विरोधी पक्षातील अटलजी म्हणजे तुकारामांनी म्हटलेले “मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे” याची मूर्तीमंत प्रचीती!! मी संसदेच्या ग्यालरीतून त्यांची ४-५ भाषणं ऐकली आहेत. मला आठवतं तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी अनेक खाती स्वत:कडे ठेवली होती. त्यावर संसदेत बोलतांना अटलजी म्हणाले “ देश को रक्षा मंत्री नही है, प्रधानमंत्री रक्षा मंत्री है, देश को शिक्षा मंत्री नही है, प्रधानमंत्री शिक्षा मंत्री है” यातलं रक्षा-शिक्षा यमक अत्यंत सहजतेने जुळवून आणावं ते त्यांनीच, इतरांना संसदेत असं काव्य स्वरुपात वास्तव मांडण असाध्य ठरावं, मात्र अटलजी ते सहज साध्य करत.

संसदेत तेव्हा रामायण या लोकप्रिय मालिकेतील दोन कलाकार दीपिका (सीता) आणि अरविंद त्रिवेदी (रावण) निवडून आले होते. एका विषयावर (मला वाटते अयोध्येतील राम मंदीर) बोलताना अटलजी रंगात आले होते आणि समोरून कॉंग्रेस सदस्य मात्र त्यांना सतत डिवचत होते. कॉंग्रेस सदस्य म्हणत “सीता आपके बाजु मे बैठी है, और रावण भी आपकेही बाजू मे बैठे है” अटलजींनी ते ३-४ वेळा ऐकलं, मग अचानक त्यांचा तो प्रसिद्ध पॉज घेऊन म्हणाले “ हां हां मुझे मालूम है सीता मेरे बाजुमे बैठी है, रावण भी मेरे बाजुमे बैठे है, लेकिन वानर सेना मे इतना शोर क्यों हो रहा है भाई?” आणि संपूर्ण सभागृह अर्थातच हास्यकल्लोळात बुडालं...हजरजबाबीपणा आणि प्रसंगावधान असावे तर असे!

मध्यान्हीचा सूर्य कधीतरी पश्चिमेकडे प्रवास करणारच मात्र त्याची प्रभा आकाशाला निश्तिच व्यापून राहते तसे अटलजी आता राजकारणातील निवृत्ती भोगत असले तरी त्यांची प्रभा मात्र भारतीय राजकारण-समाजकारणाला व्यापून राहिली आहे आणि शरीराने थकलेले का असेना, आपण ज्या जगात आहोत त्याच जगात अटलजी आहेत ही भावना देखील मनाला मोठा दिलासा देणांरी आहे. ईश्वर त्यांना उदंड आणि आरोग्यपूर्ण आयुष्य देवो.

***