Friday, August 17, 2012

कॉंग्रेसने आणि म. गांधींनी अखंड भारत का नाकारला ?



प्रख्यात विचारवंत प्रा.शेषराव मोरे यांचे "कॉंग्रेसने आणि म. गांधींनी अखंड भारत का नाकारला? " हे पुस्तक काल खरेदी केले आणि अधाशीपणे अर्धे अधिक रात्री वाचून काढले...जबरदस्त पुस्तक आहे....फाळणी का झाली, तिची अपरिहार्यता काय होती, म. गांधी आणि (तत्कालीन) कॉंग्रेस यांनी हा विषय कसा हाताळला याचे फारच मार्मिक विश्लेषण या पुस्तकात आहे. माझ्या वाचण्यात "फाळणी" या विषयावरची अनेक भाषांमधील अनेक पुस्तके आली, मात्र 'या सम हेच' असेच या पुस्तकाच्या बाबतीत म्हणावे लागेल.फाळणीचा एवढा वस्तुनिष्ठ आणि निष्पक्ष विचार करणे इतर लेखकांना जमलेले नाही....

अर्थात आता "निष्पक्ष आणि तटस्थ" हा विचारच हद्दपार झालेला असल्याने वेगवेगळ्या "इझ्म्स" वाल्यांनी आपापला इझम हाच कसा मोक्षाचा मार्ग आहे हे उच्च रवात सांगत राहणे एवढेच वैचारिक संचित आपल्याकडे उरले आहे. नरहर कुरुंदकर, हमीद दलवाई, स.ह. देशपांडे आणि शेषराव मोरे हे माझ्या वाचनाचे चार वेद आहेत असे मी म्हणतो. या चौघांमध्ये समान सूत्र असे की त्यांचे विचार "आंधळा धर्मवाद" आणि "आंधळा धर्म निरपेक्षतावाद " या दोन्ही आचरट वादांपासून शेकडो मैल दूर आणि म्हणूनच तटस्थ आणि निष्पक्ष राहिले.....विशेषतः फाळणी हा विषय असा आहे की ज्याचे नाव निघताच धर्माभिमानी वगैरे लोक दु:खात बुडून जातात तर थोतांडी धर्मनिरपेक्षतावाले त्यात मुस्लिमांचा कसा काहीच दोष नव्हता हे उर बडवून सांगतात....हिंदुत्व वाद्याना आसिंधुसिंधूपर्यन्ता वगैरे असा "अखंड भारत" आजही निर्माण होऊ शकतो असे दिवास्वप्न दिसते तर सेक्युलर वाद्यांना लगेच एतद्देशीय मुस्लिमांचे काय होणार या चिंतेने निद्रानाशाचा विकार जडतो. मुळात "अखंड भारत" कधीच नव्हता, सांस्कृतिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या भिन्न सहाशे संस्थानांचा सहभाग असलेला देश "अखंड" झाला तो काही प्रमाणात ब्रिटिशांनी त्याचे "राजकीय" एकीकरण केल्यामुळेच हे हिंदुत्ववादी समजून घेत नाहीत आणि फाळणी केली म्हणून गांधीजींना दोषी धरतात दुसऱ्या बाजूला ढोंगी धर्म निरपेक्षतेला कवटाळून बसणारे फाळणीला केवळ भावनेचा विषय मानून मुस्लिमांच्या संतुष्टीकरणांत स्वतःच्या विचारांचे सौख्य सामावले आहे असे मानतात ! या दोन्ही वैचारिक भोंगळतेला छेद देत हे पुस्तक फाळणी बाबत एक नवाच दृष्टीकोन आपल्याला देऊन जाते, ते ही सज्जड पुरावा आपल्यासमोर ठेवत !

या पुस्तकाचे नाव "कॉंग्रेसने आणि म. गांधींनी फाळणी का स्वीकारली" असे न ठेवता "कॉंग्रेसने आणि म. गांधींनी अखंड भारत का नाकारला?" असे ठेवले आहे...यावरून बराच बोध होतो... शेषराव मोरे यांनी अतिशय परिश्रम पूर्वक लिहिलेले हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावे असे मी आग्रहाने सांगेन... खास "कुरुन्द्करी" परंपरेतील हे पुस्तक फाळणीच्या विषयातील एक महत्वाचे पुस्तक म्हणून तटस्थ विचारांच्या विश्वात लोकप्रिय होईल यात शंका नाही.....

Tuesday, August 7, 2012

“टीम”ला शुभेच्छा ! आंदोलन मात्र सुरु रहावे...


आदरणीय अण्णांनी केलेले ‘टीम’चे विसर्जन, राजकीय पक्ष स्थापन करण्याची “टीम”ची उतावीळ घोषणा आणि “आता आंदोलनाने काही फरक पडणार नाही” अशी हाराकीरीची टीमने घेतलेली भूमिका या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या ३-४ दिवसांपासून अक्षरशः शेकडो कार्यकर्त्यांचे आलेले फोन, इमेल अथवा फेसबुक निरोप, माध्यमांकडून सतत होणारी विचारणा, पुढे काय ? असा चळवळीतील कार्यकर्त्यांना पडलेला स्वाभाविक प्रश्न या सर्व पार्श्वभूमीवर मी या ब्लॉगद्वारे भूमिका मांडत आहे. गेले २ दिवस मी आजारी असून घश्याच्या Infection मुळे बोलू शकत नाही, त्यामुळे हा ब्लॉग लिहीत आहे.

.      'टीम'ने पक्ष स्थापनेचा घेतलेला निर्णय :

राजकारणात चांगल्या लोकांनी आले पाहिजे आणि वेळ पडली तर राजकीय भूमिका घेतली पाहिजे ही भूमिका मला मान्य आहे; मात्र कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या वेळी ही भूमिका घ्यावी याचे काही ताळतंत्र टीमने बाळगणे गरजेचे होते.

पहिला मुद्दा असा की आंदोलनाचा उपयोग होत नाही म्हणून राजकीय पक्ष काढला पाहिजे हा अत्यंत उथळ युक्तिवाद आहे. ६५ वर्षात राजकीय व्यवस्थेने लोकांसमोर जे प्रश्न उभे केले त्याची थोडीफार उत्तरे चळवळी/आंदोलने यांनीच समाजाला दिली आहेत. स्वत: अण्णांनी आजवर महाराष्ट्रात जी आंदोलने केली ती सर्व यशस्वी झाली आहेत हे “टीम” मधील विद्वानांनी लक्षात घ्यायला हवे होते. अण्णांची आंदोलने यशस्वी झाली नसती तर बदलीच्या कायद्यापासून माहितीच्या कायद्यापर्यंत अनेक लोकोपयोगी कायदे झालेच नसते. नर्मदा आंदोलनाने विस्थापितांसाठी लढा उभारला नसता तर पुनर्वसनाचा एकही प्रश्न सुटला नसता. लवासा, आदर्श हे सगळे प्रश्न चळवळी उभारल्याने मार्गी लागले, महाराष्ट्रात चार एसईझेड आत्ता आत्ताच सरकारला रद्द करावे लागले, सिंगूर, नंदीग्राम असो की भट्टा पर्सौला, सर्व ठिकाणी चळवळीच लोकांचा आधार झाल्या आहेत. रामलीला मैदानावर लोकांनी “आंदोलनाला”च प्रतिसाद दिला होता, राजकारणाला नाही! असे असतांना आता आंदोलनाने काही होणार नाही या निष्कर्षाला “टीम” कशी आली? तुम्हाला राजकीय महत्वाकांक्षा असतील आणि तुम्ही जरूर राजकारणात जा, आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, अरविंद केजरीवाल पंतप्रधान झालेले बघायला आम्हालाही आवडेल, मात्र त्यासाठी आंदोलनान्वरचा लोकांचा विश्वास उडेल अशी मांडणी करण्याचे कारण काय? किरण बेदी, मनिष सिसोदिया, कुमार विश्वास यांनी किती चळवळी आजपर्यंत केल्या की म्हणून त्यांनी घाईने असा निष्कर्ष काढला?  आणि मुद्दा असाही आहे की गेली ३५ वर्षे संघर्ष करून अण्णा थकलेले नाहीत याउलट केवळ १६ महिन्यातच जी टीम आंदोलनाला कंटाळली ती एका वर्षातच कशावरून राजकारणालाही कंटाळणार नाही? त्या दृष्टीने या आंदोलनाचे social suicide followed by political abortion असे रुपांतर झाले तर सगळेच संपेल, हा फार मोठा धोका समोर दिसतो आहे.

दुसरा मुद्दा असा की जर राजकीय पक्ष काढायची अनिवार्यता होतीच तर हा मुहूर्त त्याला योग्य होता का? दहा दिवसाच्या अयशस्वी उपोषणांनंतर अशी घोषणा करणे व्यवहार्य होते का? कदाचित रामलीला मैदानावर तेरा दिवसांचे उपोषण संपतांना अशी घोषणा झाली असती तर ते समजण्यासारखे होते. “आम्ही संसदे बाहेरची लढाई जिंकली असून आता संसदेच्या आत जाण्याची लढाई जिंकून दाखवू” अशी विजीगिषु भूमिका त्यावेळी शोभून दिसली असती. एखादा विद्यार्थी मेरीटने पास झाला त्या दिवशी त्याने “मी आता अमुक-तमुक परीक्षाही देणार आहे” अशी घोषणा करणे वेगळे आणि नापास झाल्याच्या दिवशी अशी घोषणा करणे वेगळे ! दुसऱ्या स्थितीत ती घोषणा न ठरता ‘फुकाची वल्गना’ ठरते याचे तरी भान सुविद्य आणि धोरणी अशा “टीम”ने बाळगायला हवे होते!    

तिसरा मुद्दा असा की राजकीय भूमिका घ्यावीच लागणार असेल तर त्यासाठी पक्ष काढण्याची गरज आहे का? आणि पक्ष काढण्यासाठी पैसा, दारू, गुंड कुठून आणायचे? देशभरात निवडक ठिकाणी (उदा. १००-१२५) चांगले अपक्ष उमेदवार उभे करून त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणण्यासाठी मोठी मोहीम राबवणे शक्य नव्हते का? अशा प्रचाराला अण्णाही बाहेर पडले असते आणि आंदोलनातील कार्यकर्तेही त्यात सहभागी झाले असते.

या राजकीय पक्षात न जाण्याचा माझ्यासह अनेकांचा निर्णय झालेला आहे. भविष्यातील राजकारणासाठी आम्ही “केजरीवाल आणि मंडळी” यांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो. राजकारणाची खुमखुमी भविष्यात आलीच तर आम्ही योग्य त्या प्रस्थापित पक्षात जाऊ कारण तिकडे निवडून येण्याची शक्यता जास्त आहे !! आम्ही सर्व समविचारी कार्यकर्ते लवकरच राळेगण येथे जाऊन अण्णांची भेट घेऊ आणि भ्रष्टाचार विरोधी लढाई त्यांनी पुढेही चालू ठेवावी अशी विनंती करू. आम्ही राष्ट्रीय दर्जाचे नेते नसलो, सामान्य कार्यकर्ते असलो तरी दिल्लीकरांपेक्षा चांगल्या पद्धतीने आंदोलन पुढे नेऊ शकतो हा आमचा आत्मविश्वास आहे.         

कॉंग्रेसने टीम साठी दोन सापळे रचले होते. फक्त अण्णाच का उपोषण करतात? टीम का करत नाही? हा पहिला सापळा होता. या प्रश्नाचे सरळ उत्तर असे होते की उपोषण हा “वैयक्तिक” सत्त्याग्रह असतो, सामुहिक नव्हे. स्वातंत्र्यापूर्वी गांधीजी एकटेच उपोषणाला बसत, एका महिन्यात गांधीजी आणि दुसऱ्या महिन्यात नेहरू, पटेल उपोषण करतात असे कधीच दिसले नाही. दुसरा सापळा होता तो “तुम्ही राजकारणात येऊन दाखवा” हा! खरे म्हणजे गेल्या ६५ वर्षात देशाचे वाटोळे राजकारणातील बजबजपुरीमुळेच झाले आहे आणि म्हणून राजकीय पक्षातील चांगल्या लोकांनी आता समाजकारणात यावे असा प्रतिहल्ला चढविता आला असता मात्र दुर्दैवाने “टीम” दोन्ही सापळ्यांमध्ये अलगद फसली. शेवटी कॉंग्रेसमधील विकृत विचारांच्या लोकांनी दिलेले आव्हान कितपत मनावर घ्यायचे याचा विचार चळवळीचा गळा घोटण्यापुर्वी ‘महामहोपाध्याय’ मनिष सिसोदिया, कुमार विश्वास, किरण बेदी, संजय सिंग, गोपाल राय प्रभृतींनी करायला हवा होता, किमान अरविंद केजरीवाल असा विचार करू शकले असते. हा निर्णय घेतांना अण्णांचा नाईलाज झाला असे त्यांच्या ब्लॉग वरून आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून दिसतेच.      

 २. अण्णांनी “कोअर कमिटी” आणि “टीम” बरखास्त करणे

मी या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो ! या निर्णयाचे सर्व कार्यकर्तेही स्वागतच करतील. आता एकदा टीम राजकीय पक्ष काढणार म्हटल्यावर “टीम” कायम ठेवून त्यांच्या भविष्यातील बेजबाबदार वर्तनाची / वक्तव्यांची जबाबदारी अण्णांनी का घ्यावी? जे झाले ते योग्यच झाले, भ्रष्टाचार विरोधातील लढाईने आता “पुनश्च: हरिओम” करावे. आम्ही सर्वजण त्यासाठी सज्ज असू.   
प्रकृती बरी होताच सर्वच विषयाच्या अनुषंगाने माझी भूमिका विस्तृतपणे मांडणार आहे; तूर्तास कार्यकर्त्यांमध्ये माझ्या भूमिकेबद्दल कुठलाही संभ्रम असू नये यासाठी हा लेखनप्रपंच.

***