Tuesday, August 7, 2012

“टीम”ला शुभेच्छा ! आंदोलन मात्र सुरु रहावे...


आदरणीय अण्णांनी केलेले ‘टीम’चे विसर्जन, राजकीय पक्ष स्थापन करण्याची “टीम”ची उतावीळ घोषणा आणि “आता आंदोलनाने काही फरक पडणार नाही” अशी हाराकीरीची टीमने घेतलेली भूमिका या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या ३-४ दिवसांपासून अक्षरशः शेकडो कार्यकर्त्यांचे आलेले फोन, इमेल अथवा फेसबुक निरोप, माध्यमांकडून सतत होणारी विचारणा, पुढे काय ? असा चळवळीतील कार्यकर्त्यांना पडलेला स्वाभाविक प्रश्न या सर्व पार्श्वभूमीवर मी या ब्लॉगद्वारे भूमिका मांडत आहे. गेले २ दिवस मी आजारी असून घश्याच्या Infection मुळे बोलू शकत नाही, त्यामुळे हा ब्लॉग लिहीत आहे.

.      'टीम'ने पक्ष स्थापनेचा घेतलेला निर्णय :

राजकारणात चांगल्या लोकांनी आले पाहिजे आणि वेळ पडली तर राजकीय भूमिका घेतली पाहिजे ही भूमिका मला मान्य आहे; मात्र कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या वेळी ही भूमिका घ्यावी याचे काही ताळतंत्र टीमने बाळगणे गरजेचे होते.

पहिला मुद्दा असा की आंदोलनाचा उपयोग होत नाही म्हणून राजकीय पक्ष काढला पाहिजे हा अत्यंत उथळ युक्तिवाद आहे. ६५ वर्षात राजकीय व्यवस्थेने लोकांसमोर जे प्रश्न उभे केले त्याची थोडीफार उत्तरे चळवळी/आंदोलने यांनीच समाजाला दिली आहेत. स्वत: अण्णांनी आजवर महाराष्ट्रात जी आंदोलने केली ती सर्व यशस्वी झाली आहेत हे “टीम” मधील विद्वानांनी लक्षात घ्यायला हवे होते. अण्णांची आंदोलने यशस्वी झाली नसती तर बदलीच्या कायद्यापासून माहितीच्या कायद्यापर्यंत अनेक लोकोपयोगी कायदे झालेच नसते. नर्मदा आंदोलनाने विस्थापितांसाठी लढा उभारला नसता तर पुनर्वसनाचा एकही प्रश्न सुटला नसता. लवासा, आदर्श हे सगळे प्रश्न चळवळी उभारल्याने मार्गी लागले, महाराष्ट्रात चार एसईझेड आत्ता आत्ताच सरकारला रद्द करावे लागले, सिंगूर, नंदीग्राम असो की भट्टा पर्सौला, सर्व ठिकाणी चळवळीच लोकांचा आधार झाल्या आहेत. रामलीला मैदानावर लोकांनी “आंदोलनाला”च प्रतिसाद दिला होता, राजकारणाला नाही! असे असतांना आता आंदोलनाने काही होणार नाही या निष्कर्षाला “टीम” कशी आली? तुम्हाला राजकीय महत्वाकांक्षा असतील आणि तुम्ही जरूर राजकारणात जा, आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, अरविंद केजरीवाल पंतप्रधान झालेले बघायला आम्हालाही आवडेल, मात्र त्यासाठी आंदोलनान्वरचा लोकांचा विश्वास उडेल अशी मांडणी करण्याचे कारण काय? किरण बेदी, मनिष सिसोदिया, कुमार विश्वास यांनी किती चळवळी आजपर्यंत केल्या की म्हणून त्यांनी घाईने असा निष्कर्ष काढला?  आणि मुद्दा असाही आहे की गेली ३५ वर्षे संघर्ष करून अण्णा थकलेले नाहीत याउलट केवळ १६ महिन्यातच जी टीम आंदोलनाला कंटाळली ती एका वर्षातच कशावरून राजकारणालाही कंटाळणार नाही? त्या दृष्टीने या आंदोलनाचे social suicide followed by political abortion असे रुपांतर झाले तर सगळेच संपेल, हा फार मोठा धोका समोर दिसतो आहे.

दुसरा मुद्दा असा की जर राजकीय पक्ष काढायची अनिवार्यता होतीच तर हा मुहूर्त त्याला योग्य होता का? दहा दिवसाच्या अयशस्वी उपोषणांनंतर अशी घोषणा करणे व्यवहार्य होते का? कदाचित रामलीला मैदानावर तेरा दिवसांचे उपोषण संपतांना अशी घोषणा झाली असती तर ते समजण्यासारखे होते. “आम्ही संसदे बाहेरची लढाई जिंकली असून आता संसदेच्या आत जाण्याची लढाई जिंकून दाखवू” अशी विजीगिषु भूमिका त्यावेळी शोभून दिसली असती. एखादा विद्यार्थी मेरीटने पास झाला त्या दिवशी त्याने “मी आता अमुक-तमुक परीक्षाही देणार आहे” अशी घोषणा करणे वेगळे आणि नापास झाल्याच्या दिवशी अशी घोषणा करणे वेगळे ! दुसऱ्या स्थितीत ती घोषणा न ठरता ‘फुकाची वल्गना’ ठरते याचे तरी भान सुविद्य आणि धोरणी अशा “टीम”ने बाळगायला हवे होते!    

तिसरा मुद्दा असा की राजकीय भूमिका घ्यावीच लागणार असेल तर त्यासाठी पक्ष काढण्याची गरज आहे का? आणि पक्ष काढण्यासाठी पैसा, दारू, गुंड कुठून आणायचे? देशभरात निवडक ठिकाणी (उदा. १००-१२५) चांगले अपक्ष उमेदवार उभे करून त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणण्यासाठी मोठी मोहीम राबवणे शक्य नव्हते का? अशा प्रचाराला अण्णाही बाहेर पडले असते आणि आंदोलनातील कार्यकर्तेही त्यात सहभागी झाले असते.

या राजकीय पक्षात न जाण्याचा माझ्यासह अनेकांचा निर्णय झालेला आहे. भविष्यातील राजकारणासाठी आम्ही “केजरीवाल आणि मंडळी” यांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो. राजकारणाची खुमखुमी भविष्यात आलीच तर आम्ही योग्य त्या प्रस्थापित पक्षात जाऊ कारण तिकडे निवडून येण्याची शक्यता जास्त आहे !! आम्ही सर्व समविचारी कार्यकर्ते लवकरच राळेगण येथे जाऊन अण्णांची भेट घेऊ आणि भ्रष्टाचार विरोधी लढाई त्यांनी पुढेही चालू ठेवावी अशी विनंती करू. आम्ही राष्ट्रीय दर्जाचे नेते नसलो, सामान्य कार्यकर्ते असलो तरी दिल्लीकरांपेक्षा चांगल्या पद्धतीने आंदोलन पुढे नेऊ शकतो हा आमचा आत्मविश्वास आहे.         

कॉंग्रेसने टीम साठी दोन सापळे रचले होते. फक्त अण्णाच का उपोषण करतात? टीम का करत नाही? हा पहिला सापळा होता. या प्रश्नाचे सरळ उत्तर असे होते की उपोषण हा “वैयक्तिक” सत्त्याग्रह असतो, सामुहिक नव्हे. स्वातंत्र्यापूर्वी गांधीजी एकटेच उपोषणाला बसत, एका महिन्यात गांधीजी आणि दुसऱ्या महिन्यात नेहरू, पटेल उपोषण करतात असे कधीच दिसले नाही. दुसरा सापळा होता तो “तुम्ही राजकारणात येऊन दाखवा” हा! खरे म्हणजे गेल्या ६५ वर्षात देशाचे वाटोळे राजकारणातील बजबजपुरीमुळेच झाले आहे आणि म्हणून राजकीय पक्षातील चांगल्या लोकांनी आता समाजकारणात यावे असा प्रतिहल्ला चढविता आला असता मात्र दुर्दैवाने “टीम” दोन्ही सापळ्यांमध्ये अलगद फसली. शेवटी कॉंग्रेसमधील विकृत विचारांच्या लोकांनी दिलेले आव्हान कितपत मनावर घ्यायचे याचा विचार चळवळीचा गळा घोटण्यापुर्वी ‘महामहोपाध्याय’ मनिष सिसोदिया, कुमार विश्वास, किरण बेदी, संजय सिंग, गोपाल राय प्रभृतींनी करायला हवा होता, किमान अरविंद केजरीवाल असा विचार करू शकले असते. हा निर्णय घेतांना अण्णांचा नाईलाज झाला असे त्यांच्या ब्लॉग वरून आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून दिसतेच.      

 २. अण्णांनी “कोअर कमिटी” आणि “टीम” बरखास्त करणे

मी या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो ! या निर्णयाचे सर्व कार्यकर्तेही स्वागतच करतील. आता एकदा टीम राजकीय पक्ष काढणार म्हटल्यावर “टीम” कायम ठेवून त्यांच्या भविष्यातील बेजबाबदार वर्तनाची / वक्तव्यांची जबाबदारी अण्णांनी का घ्यावी? जे झाले ते योग्यच झाले, भ्रष्टाचार विरोधातील लढाईने आता “पुनश्च: हरिओम” करावे. आम्ही सर्वजण त्यासाठी सज्ज असू.   
प्रकृती बरी होताच सर्वच विषयाच्या अनुषंगाने माझी भूमिका विस्तृतपणे मांडणार आहे; तूर्तास कार्यकर्त्यांमध्ये माझ्या भूमिकेबद्दल कुठलाही संभ्रम असू नये यासाठी हा लेखनप्रपंच.

***

11 comments:

  1. atishay spashta aani sadetod vichar...

    ReplyDelete
  2. मला तुमची भूमिका पटली आणि लेखन आवडले. शुभेच्छा.

    ReplyDelete
  3. atishay barobar ahe sir tumache vichar pan pudhe kay?andolan maharashtra levella karayache ki national levela.mala vatate annani ekatyane he andolan kele asate tar result vegala rahu shakla asata

    ReplyDelete
  4. i think apan punha navyane ha ladha ubharla pahije pan yaveli sampurn takadine

    ReplyDelete
  5. अतिशय प्रभावीपणे आपले विचार मांडल्याबद्दल धन्यवाद. हा लेख वाचल्यावर विचारांना चालना मिळून पुढे काय करावे हे सुस्पष्ट झालं. we are with you sir, thanks...

    ReplyDelete
  6. आणखी एक, पक्ष काढण्यापेक्षा चांगल्या आणि जबाबदार उमेदवारांना (पक्षीय किंवा अपक्ष) पाठींबा देवून त्यांना संसदेत / विधानसभेत पाठवून देखील बरीच चांगली कामे होवू शकतात.

    ReplyDelete
  7. तुमचे विचार नेहमीच मार्गदर्शक वाटतात, तुम्ही तब्येत बरी नसतानाही वेळात वेळ काढून तुमचे विचार मांडले त्याबद्दल धन्यवाद !
    यासंदर्भात अण्णांना भेटायला नक्कीच आवडेल, तुम्ही पूर्व कल्पना दिलीत तर नक्कीच यायला आवडेल !
    अन्नाचे टिम बरखास्त करणे आवडले, पण ते असे निर्णय एकटेच कसे घेतात ते कळत नाही, टिम म्हंटल्यावर टीम मेंबर्स ला विचारायला नको होते का? चर्चा करायला नको होती का?

    ReplyDelete
  8. Congratulations Vishwambharji for a firm and clear stand. I appriciate and support your veiws.
    Manmohan Vaidya.

    ReplyDelete
  9. आपली भूमिका मनापासून पटली. 'आंदोलने' यशस्वी झाली म्हणून तर माहितीचा अधिकाराचा कायदा झाला. विस्थापितांसाठी लढा उभारण्याचे श्रेय 'आंदोलना'लाच आहे. झाले. लवासा, आदर्श हि प्रकरणेही 'चळवळी'मुळेच बाहेर आली. अशी चळवळ उभी करण्यासाठी 'टीम'च असली पाहिजे असे कुठे आहे. एकटा माणूसही सत्याची कास धरून चिकाटीने व्यवस्थेविरुध्द लढा उभारू शकतो, आणि तो नक्की जिंकू शकतो. आपण सामान्य कार्यकर्ते असलात तरीदेखील दिल्लीकरांपेक्षा चांगल्या पद्धतीने हे आंदोलन पुढे न्याल यावर आमचाही विश्वास आहे..! शुभेच्छा आणि जय हिंद.!

    ReplyDelete
  10. 100% manaatla bolalaat tumhi."Shakti peksha yukti shresta" he kitihi clished vatale tari tech satya aahe. Hya velis tari Congress che lok Team peksha nakkich hushaar nighale.

    ReplyDelete
  11. From Archive:

    "Sanjay Kulkarni
    April 7, 2011

    Swami Agnivesh is misleading people. 'Bhrashtachar' will not end once Jan Lokpal Bill is sanctioned. It is going to be extremely difficult and very long war. So please don't show impractical dreams.

    Also, Shri Kejariwal should use more parliamentary language. He is talking the language of an election speech.

    If care is not taken, these two people can give a setback to the movement."

    ReplyDelete