Wednesday, February 2, 2011

पंडितजी गेले...

स्वरभास्कर, भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी २४ तारखेला आपल्यातून निघून गेले. उद्या त्यांची जयंती आहे. खरे म्हणजे त्यांचा वाढदिवस असे न लिहिता जयंती आहे असे लिहिणे फारच वेदनादायक असले तरी आता ते एक सत्य म्हणून स्वीकारले पाहिजे. पुण्याचे सर्वात तेजःपुंज वैभव लुप्त झाले आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा सूर्य मावळला आहे. गेली काही वर्षे तब्येतीमुळे ते गाऊ शकले नसले तरी ज्या जगात पंडित भीमसेन जोशी रहात आहेत त्याच जगात आपण रहात आहोत ही भावना देखील अतिशय आनंददायक होती, आता त्या भावनेला आपण मुकलो आहोत.


आपल्या सर्वांच्या मनात पंडितजींचे जे चित्र आहे- चार तंबोरे आणि त्यात गंभीर भाव-मुद्रा धारण करून बसलेले पंडितजी- यापेक्षा दुसरे सुंदर चित्र कदाचित जगाच्या निर्मात्यालाही काढता येणार नाही! मला असे वाटते की पंडितजींनी गाण्यासाठी "सा" लावला की स्वर्गाची सगळी देवश्रुष्टी पृथ्वीकडे कान एकवटीत असावी . स्वर्गात त्यांना एवढे चांगले गाणे कधी ऐकायला मिळणार?


सूर्याच्या तेजाची चिकित्सा करता येत नाही, सागराच्या तांडवाचे मोजमाप करता येत नाही त्याप्रमाणे  पंडितजींच्या गाण्याची समीक्षा करणेही शक्य नाही, त्यांच्या गाण्याला आणि प्रतिभेला शरण जाणे एवढेच रसिकांच्या हाती उरते... आणि उरते एक कृतज्ञता...पंडीतजींनी मैफिलीतुन घरी परतणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला भरभरून दिलेली स्वरांची कुबेर देणगी...स्वरांमधून भेटीला आलेली चैतन्याची दिव्य अनुभूती...बस्स...शब्दात त्याला कोण कसं बांधणार? आणि त्याला शब्दात बांधायचे तरी कशासाठी? ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे:
सांगे सूर्याचा घरी, प्रकाशु काय वाती करी? 
की न लाविजे तरी अंधारी,  कोंडेल तो
सूर्याच्या घरी प्रकाश पडण्यासाठी जसा वातीचा काही उपयोग नाही त्याच प्रमाणे भीमसेनजींच्या स्वरविश्वाला शब्द्कळेने व्यक्त करता येणे शक्य नाही.


पंडितजींचा स्वर जगभर राज्य करीत असे. पन्नास वर्षांहून अधिक काळ एखाद्या क्षेत्रात प्रथम क्रमांकावर राज्य करणे ही सोपी गोष्ट नाही. रसिकांना त्यांनी काय दिले नाही? अक्षरशः हजारो मैफिली आणि त्यातून तृप्त झालेले कोट्यावधी श्रोते ही किमया यापुढे कोणाला साधेल असे वाटत नाही.  पंडीतजींच्या भात्यात अशी विलक्षण अस्त्रे होती की ऐकणाराने केवळ दिपून जावे. एक कोमल रिषभ आसावरी तोडी सारखा राग...पण प्रत्येक वेळी त्याचे वेगळे रूप दाखविण्याची त्यांची अलौकिक प्रतिभा जणू श्रोत्यांना सांगत असे की घ्या...हेही घ्या आणि तेही घ्या..घेऊन घेऊन किती घ्याल? श्रोत्यांच्या मनातील प्रत्येक आस पंडितजींचा स्वर पूर्ण करून जाई..
का जे लळेयांचे लळे सरती, मनोरथांचे मनोरे पुरती,
जरी माहेरे श्रीमंत होती, तुम्हा जैसी..
रसिकांच्या साठी पंडितजी म्हणजे एक असेच श्रीमंत माहेर होते ज्याने रसिकांच्या कानाचे सर्व लळे पुरविले आणि स्वरांची मनोरथे सिद्धीस नेली.


अपरंपार गुरुभक्तीचे दुसरे उदाहरण देता येऊ नये अशी उत्कट गुरुभक्ती पंडितजींनी जागविली. पुण्यात दिमाखात सुरु असलेला सवाई गंधर्व संगीत महोत्सव हे त्याच गुरुभक्तीचे एक प्रकट रूप. एवढा महान कलाकार ज्या अनन्यभावाने आपल्या गुरूस शरण जात असे त्या भावनेस तोड नाही. "गुरु बीन  ग्यान न  पावे' हा मारवा गाणं सोपं आहे, आयुष्यभर त्या कृतज्ञभावाला शरण जाणं ही फार अवघड गोष्ट आहे. पंडितजींनी ती आयुष्यभर साधली.


सर्व जगभर मान्यता, भारतरत्न सारखे सर्वोच्च पुरस्कार, शास्त्रीय संगीतात धृवासारखे अढळ पद लाभूनही पंडितजींच्या वागण्यात त्याचा कुठलाही गर्व तर सोडाच अभिमानही कधी दिसला नाही. एवढे सगळे मिळूनही "इदं न मम" म्हणायला जी अध्यात्मिक उंची लागते तीही त्यांनी केंव्हाच गाठली होती. त्यांच्या अनेक वर्षांच्या गान -तपश्चर्येला आलेली फळे त्यांनी अतिशय अलिप्तपणे सांडून दिली.
वृक्ष का वेली, लोटती फळे आली,
तैसी सांडे निपजिली, कर्मेसिद्धी
अशी आपल्या कर्माला आलेली मधुर फळे त्यागण्याची, सांडून देण्याची विरक्ती पंडितजींसारख्या कर्मयोग्यालाच साध्य होऊ शकते. भारतीय शास्त्रीय संगीतात पंडितजींचे स्थान "सर्व शास्त्रांचे माहेर, उपनिषदांचे सार" असे असले तरी त्याच्या गर्व त्यांनी कधीच केला नाही.
अखंड अगर्विता होऊनी असती, तयांते विनयो हेची संपत्ती,
जे जयजयमंत्रे अर्पिती, माझ्याची ठायी
या ओवीप्रमाणे पंडितजींनी त्यांचे जगभर झालेले जयजयकारही जणू त्या नाद्ब्रह्मालाच अर्पण केले आणि निर्लेपपणे  हे जग सोडले...    
           
"धींना धीन्धीना" हा भजनी ठेका जेंव्हा जेंव्हा मी ऐकतो आणि ऐकेल तेंव्हा तेंव्हा माझ्या मनःचक्षुपुढे पांडूरंगाच्या आधी भीमसेन जोशीच उभे राहिले आणि उभे राहतील...


* * *