Sunday, May 3, 2015

लेख क्र.२ - ‘अस्मिता’ नावाची असमृद्ध अडगळ !

‘अस्मिता’ नावाची असमृद्ध अडगळ !

सगळ्या देशाचं लक्ष वेधून घेणारी एक घटना तामिळनाडूत गेल्या आठवड्यात घडली. पी. मुरुगन नावाच्या प्राध्यापक-लेखकानं आपण ‘मृत’ झाल्याचं घोषित केलं! घडलं ते असं की तामिळनाडू मधील नमक्कल या गावी सरकारी महाविद्यालयात प्राध्यापक आणि त्याहून महत्वाचं म्हणजे एक संवेदनशील लेखक असलेले पेरूमल मुरुगन यांनी ‘माधुरोबागन’ या नावाची एक कादंबरी प्रकाशित केली. या कादंबरीत तामिळनाडूच्या कोंगुनाडू भागातल्या गत काळातील एका प्रथेची कथा आहे. ही प्रथा खरोखरच अस्तित्वात होती. तीरुचेंगोड येथील ‘माधुरोबागन’ या दैवताची यात्रा दरवर्षी भरत असे. प्रथा अशी होती की अपत्य जन्माला न घालू शकलेल्या स्त्रिया या यात्रेत येत असंत आणि आवडेल त्या पुरुषासोबत समागम करून अपत्य प्राप्ती करून घेत असंत. हे सगळं त्यांच्या नवऱ्याच्या संमतीने चाले आणि ज्या पुरुषापासून गर्भधारणा झाली त्याला देवाचा मान दिला जाई. ही प्रथा त्यांनी कादंबरीतून चित्रित केल्याचं निमित्त झालं आणि तामिळनाडूतील गौन्डूर या प्रबळ समाजाच्या म्हणे भावना दुखावल्या गेल्या! रस्त्यावर तमाशा सुरु झाला. प्रथेप्रमाणं केवळ अनुनयापुरत्याच उरलेल्या राजकीय पक्षांनी ‘राडा’ सुरु केला. हिंदू धर्माच्या बदनामीची दवंडी पिटली गेली आणि छोटे मोठे पक्ष अगदी भाजप, द्रमुक, अण्णा द्रमुकसह सर्वच पक्षांनी मतदाराचा अनुनय म्हणून मुरुगन यांची कोंडी केली. प्रकरण थराला गेलं, मुरुगन यांनी माफीनामा लिहून दिला आणि आपण लेखक म्हणून मृत झाल्याचं प्रसार माध्यमांतून जाहीर केलं. ‘आता माझ्यातील लेखक मेला असे समजा, मी फक्त पगारी प्राध्यापक उरलो आहे’ असं त्यांनी वेदनेनं सांगितलं. अभिव्यक्तीस्वातंत्र्य घटनेनं बहाल असलेल्या देशात असं वारंवरच घडत आलंय. सलमान रश्दी, तस्लीमा नसरीन ही जगातली देखील काही ठळक उदहरणं. भारतातील अनेक लेखकांसह आपल्या अनेक मराठी लेखकांना या वेदनेतून जावं लागलं आहेच.

जातीय आणि धर्मीय अस्मिता जागरण हा राजकीय पक्षांचा आणि समाजाचा सुद्धा एक लाडका कार्यक्रम झालाय. ही प्रथा काही कपोलकल्पित नव्हे, ती अगदी काही वर्षांपूर्वी पर्यंत अस्तित्वात होती. जेंव्हा अस्तित्वात होती तेंव्हा धर्म मार्तंडांना ती खटकली सुद्धा नसावी पण आता त्यावर एका निष्पाप लेखकानं मनुष्य-स्वभाव-वेधी कादंबरी लिहिली तर यांची अस्मिता दुखावली गेली आणि यांनी लेखकच मारून टाकला. हे म्हणजे बायकांना सती देण्याची निर्लज्ज प्रथा आम्ही वर्षानुवर्षे पाळू पण आता तुम्ही त्यावर कादंबरी लिहायची नाही अन्यथा आमच्या धार्मिक भावना दुखावतील असं म्हणण्यासारखंच आहे. बुद्धिदारिद्र्याची अनेक प्रतिभाशाली उदाहरणं आपला समाज नव्या पिढ्यांसमोर नित्यनेमानं ठेवत असतो, त्यात आणखी एका उदाहरणाची भर पडली. गेल्या काही दिवसांपासून हे जातीय आणि धार्मिक अस्मितांचं ढोंग आणि सोंग इतकं वाढलंय की आपल्या समाजाचा मेंदू नष्ट झालाय आणि केवळ ह्रदय उरलंय की काय असं वाटावं. ते ह्रदय तरी निरोगी आहे का? नाही ! त्याला रक्त पुरवठा करणाऱ्या वैचारिक, बौद्धिक धमन्या बंद पडल्यात आणि जाती-धर्माच्या विषारी धमन्यांमधूनच त्याला रक्त पुरवठा होत असल्यानं ते ह्रदय केवळ तेवढाच विचार करतंय. विरोधाभास असा आहे की हिंदू धर्म धोक्यात आहे अशी हाकाटी जे पिटतात त्यांना हिंदू धर्माचं आचरण स्वत: करावं असं देखील कधी वाटत नसावं, त्यातील किती लोक रोज पूजा करतात किंवा मंदिरात जातात हा संशोधनाचा विषय ठरावा. हीच बाब ‘इस्लाम खतरेमें’ म्हणणाऱ्यांना पण लागू पडते.

जातीय अस्मिता ज्या पद्धतीने ऊतू जात आहेत त्याला तर तोडच नाही. आमच्या जातीच्या रोजीरोटीचे, शिक्षणाचे, आरोग्याचे प्रश्न सुटले नाहीत तरी चालेल पण आमच्या जातीत जन्मलेल्या राष्ट्रपुरुषाचे स्मारक झालेच पाहिजे, पुतळे उभे राहिलेच पाहिजेत, संस्थांना नावं दिलीच पाहिजेत ही त्या त्या समाजाची (जातीची) मागणी आहे. (आजकाल अमुक जात न म्हणता अमुक समाज असं म्हणावं म्हणजे मग ‘जातीयवादी’ असण्याचा दोष निघून जातो अशी सर्वमान्य धारणा आहे). त्या त्या जातीतली ती ती माणसं भव्यदिव्य कामं करून गेली. आमची योग्यता फक्त त्यांच्या पुतळ्यांच्या उभारणीची, त्यांच्या कामाला पुढे नेण्याची नाही! ही एकूण समाजाच्या दारूण बौद्धिक पराभवाची स्थिती म्हटली पाहिजे. आम्ही बौद्धिकदृष्ट्या दिवाळखोर होण्यातच ज्यांचे हित सामावले आहे ते राजकीय पक्ष आणि सरकारं देखील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अशा बाबतीत आम्हाला प्रोत्साह्नंच देत राहणार, त्यांना तेच हवंय.

प्रश्न असा आहे की आपल्या समाजाला फक्त जातीय, धार्मिक, भाषिक किंवा प्रांतीय अस्मिताच का असाव्यात? वैज्ञानिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, पर्यावरण-विषयक अस्मिता का नसाव्यात? उदाहरणार्थ भारताच्या आण्विक कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा यांच्या मुंबईतील बंगल्याचा लिलाव किती बिनबोभाट झाला! कल्पना करा, हीच वास्तू शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, सावरकर, मौलाना आझादांच्या मालकीची असती तर? महाराष्ट्रात या लिलावावरून मुडदे पडले असते! पण आम्हाला वैज्ञानिक अस्मिताच नसल्यानं या वास्तूच्या लिलावाला फारच माफक वृत्तपत्रीय विरोध तेवढा काय तो झाला. होमी भाभा, सी व्ही रमण, जगदीशचंद्र बोस आमच्या अस्मितेचे विषयच नाहीत! धृपद गायक उस्ताद सईदुद्दिन डागर यांना पुण्यात स्वत:चं घर सुद्धा नसणं हा समाजाच्या जाणीवांचा भाग बनतच नाही कधी, पण उद्या परदेशातल्या कोणी जर धृपद संगीतावर टीका केली तर मात्र आम्ही लगेच टीका करणाऱ्याचे पुतळे जाळू. एखाद्या शाळेला एखाद्या जातीच्या राष्ट्र्पुरुषाचं नाव द्यावं म्हणून जो समाज रस्त्यावर येतो त्या समाजाला त्याच शाळेत शिक्षणाच्या चाललेल्या हेळसांडीसाठी रस्त्यावर यावं असं मात्र चुकून वाटत नाही! आसपासच्या निसर्गाचा कितीही विध्वंस कोणी केला तरी आमच्या पर्यावरणीय अस्मिता जाग्या होत नाहीत कारण त्या अस्मिता कधी तयारच झाल्या नाहीत. जातीचे टेंभे मिरवणारे आणि आमच्या जातीतील स्त्रियांनी अमुक तमुक प्रकारचे कपडे घालू नयेत वगैरे सांगणारे; ‘आमच्या जातीतील स्त्रियांना उघड्यावर जायला लागू नये म्हणू शौचालये बांधू’ असं कधीच म्हणतांना दिसत नाहीत! त्याचं कारण ‘अस्मिता’ हाच मुळात रिकामटेकड्यांनी ऐतखाऊपणा सांभाळत करायचा उद्योग राहिला आहे. स्त्रियांनी अमुक असं वागू नये असं म्हणायला श्रम आणि पैसा द्यावा लागत नाही, गावागावात शौचालायं बांधायला श्रम आणि पैसा द्यावा लागतो. फुकट्यांना अशी महाग समाजसेवा परवडतच नसते. आमच्या अस्मितांचं असं हे पोकळ आणि रिकामटेकडं आविष्करण खरोखरच उद्वेगजनक आहे.

आपण ढोंगी रहायला नको. असेच मुरुगन होणार असतील तर घटनेतल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अर्थहीन समजून त्याला घटनेतून कायमचं काढूनच का टाकू नये? एक तर आपणच स्वीकारलेल्या घटनेप्रमाणं आपण वागलं पाहिजे आणि तसं वागता येत नसेल तर घटना तरी आपल्या सामाजिक वर्तनानुसार बदलून घेतली पाहिजे! आणि कोणी काय लिहावं, कोणतं चित्र कसं काढावं, कोणतं नाटक बसवावं हे झुंडीलाच ठरवू द्यावं.  

‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता’ हे सांगताना तुकाराम आपल्याला हेच सांगतात की समाज बहुमताने म्हणतो म्हणून एखादी गोष्ट श्रेयस आहे असं समजू नका, सत्य आणि असत्याशी तिला पडताळून पाहिलंच पाहिजे आणि त्या निकषावर मन ग्वाही देत असेल तरच ते श्रेयस समजलं पाहिजे. तुकारामांच्या या बुद्धीप्रामाण्यवादाला आम्ही समाज म्हणून केव्हाच तिलांजली दिलीय. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यानं जिथं आगरकरांपासून कुरुंदकरांपर्यंत सगळ्याच विचारवंतांच्या बुद्धीप्रामाण्यवादाचा पराभव करून दाखवण्याचा चंग बांधलाय तिथं तामिळनाडूसारख्या तुलनेनं कर्मठ राज्याची काय पत्रास? झुंडी पुढं विवेक हरतो हेच मुरुगन यांच्या प्रकरणानं पुन्हा सिद्ध झालं. प्रश्न मुरुगन यांचा नाही. एक लेखक मेला म्हणून समाजाचं काही बिघडत नाही, प्रश्न असा आहे की समाजानं मेंदू बाजूला काढून ठेऊन दुषित रक्त पुरवठा असलेल्या आणि एकच कप्पा चालू असलेल्या हृदयाच्याच भरवशावर जगायचं का? की मेंदूच्या अस्तित्वाचा पण शोध घ्यायचा?

मुरुगन यांनी स्वत:ला नाही, विचार करणाऱ्या, विवेकावर विश्वास ठेवणाऱ्या समाजालाच मृत घोषित केलंय! आणि त्यांना प्रतिसाद म्हणून समाजानं देखील आपल्या वैचारिक मृत्यूची अघोषित कबुलीच दिलीय. शेवटी ‘समाज’ हरला आणि ‘झुंड’ पुन्हा जिंकली, इतकंच!  


डॉ. विश्वंभर चौधरी

2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. सर, तुमची penitreting लेखनशैली मला नेहमीच भावते. आज मात्र तुम्ही 'झुंडी पुढं विवेक हरतो' हे भेदक सत्य सांगितले.

    ReplyDelete