Sunday, May 3, 2015

लेख क्र १ - फुकाचा आत्मगौरव !

"समाजभान" या माझ्या दिव्य मराठीतील पाक्षिक सदरातील
लेख क्र. १ - फुकाचा आत्मगौरव

मुंबईत भरलेल्या सायन्स कॉंग्रेसच्या निमित्तानं आभासी विज्ञानाला (pseudo science) विज्ञान जगतात स्थान असावं का? या अनुषंगानं चर्चा होत आहे. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावायच्या आधीच भारतात विमान कला समृद्ध झालेली होती आणि आजच्या पेक्षाही सुसज्ज विमानाचं डिझाईन आपल्याकडे होतं असा त्या परिषदेत दावा करण्यात आला. आपल्याकडे हे काही आजच घडतय असं नाही, आमचीच संस्कृती मोठी त्यामुळे सगळे शोध इथेच लागले असा दावा जगातील सर्वच संशोधनांनंतर करणं ही आपली खास भारतीय परंपराच आहे! जर्मनीनं रॉकेट अंतराळात सोडलं की आपण सांगणार, त्यात काय? आमच्या रामायणात ते आधीच उडालेलं आहे, अमुक एक विद्यापीठ उत्तम दर्जा असल्यामुळं जागतिक मानांकनात पहिलं आल्याची बातमी आली की आपण म्हणणार ‘आमचं नालंदा आणि तक्षशीला ‘त्या काळात’  जगात अग्रस्थानी होतं! पण मग आज जगातील पहिल्या दोनशे अग्रमानांकित विद्यापीठांमध्ये भारतातलं एकही विद्यापीठ कसं नाही? तुमचा हा महान बौद्धिक वारसा असा कसा अचानक सरस्वती नदी सारखा लुप्त झाला? असा प्रश्न विचारला तर मात्र आम्ही निरुत्तर! एकीकडे आजच्या विद्यापीठांमधून निव्वळ राजकारण चाललंय आणि दुसरीकडे विद्यापीठांना नामविस्तार वगैरे साठी राजकारणी कसे वापरून घेताहेत याबद्दल खरंतर आपल्याला खेद वाटायला हवा, पण त्या ऐवजी भूतकाळातील समृद्ध वारश्यावर जगणं तुलनेनं सोपं आहे. वर्तमानकाळ चांगला ठेवायला मेहनत करावी लागते, भूतकाळात रमण्यासाठी केवळ स्वप्नरंजन पुरेसं ठरतं. सर्वत्र ‘शॉर्टकट’ शोधायची सवय लागलेल्या समाजाला त्यातून सुख लाभणं साहजिकच आहे.     

फक्त हेही आमच्या पूर्वजांनी केलं आणि तेही आमच्याच पूर्वजांनी केलं इथं सगळं थांबलं असतं तर तेही ठीक आहे; पण हे इथंच थांबत नाही. ज्या गोष्टीचं तंत्रच आपल्याला माहित नाही ती गोष्ट बाहेरच्यांनी केली की त्या करणारांमध्ये आपल्या वंशाचे कोण? ते आपण भिंग घेऊन शोधणार! सुनीता विल्यम्स अंतराळात गेली रे गेली की ती “भारतीय वंशाची” असल्याच्या कल्पनेनं आपल्याला उगाचच उकळ्या फुटणार. भारतीय वंशाचा कोणी मनुष्य अमेरिकेच्या अध्यक्षांचा सल्लागार झाला म्हणून आपण हुरळून जाणार! (दुसरीकडे सोनिया गांधींना मात्र विदेशी जन्माचा दाखला देत पंतप्रधान नाही होऊ देणार! एवढा दुटप्पीपणा केवळ आपल्याच देशात चालतो.) आत्मगौरवात एवढा रममाण होणारा समाज इतर देशांत अपवादानंच आढळेल. गंमतीचा भाग असा की जे भारतीय वंशाचे वगैरे म्हणून आपण त्यांच्या निमित्तानं आपली पाठ थोपटून घेतो, ते कधीच दिलखुलासपणे आपल्याला ‘आपले’ म्हणत नाहीत किंवा मी भारतीय वंशाचा असल्यानं हे करू शकलो वगैरे सारख्या प्रतिक्रिया पण देत नाहीत ! ‘मान ना मान, तू मेरा मेहमान’ असं म्हणून आपणच त्यांना चिटकायला जातो! याची खरोखरच गरज असते का? खरच यातून आपला देश मोठा होतो का? 

या सगळ्या आत्म-गौरवा मागं वर्चस्वाची भावना असते. आमचं राष्ट्र, आमचा वंश, आमची संस्कृती आणि आमची बुद्धी जगात सर्वश्रेष्ठ आहे; त्यामुळे या जगात जे जे काही घडलं ते इतरांकडून घडण्याची शक्यताच नाही, ते आमच्याकडूनच घडू शकतं म्हणून आम्हीच सर्व काही केलं असलं पाहिजे ही ती भावना आहे. अशा भावनेत पंचाईत अशी होते की वर्तमानात दाखवण्यासारखं काही नसलं तर मग भूतकाळाचा आसरा घ्यावा लागतो. ‘आम्ही आज हे करायला सक्षम नसू म्हणून काय झालं? हे तर सर्वप्रथम आमच्याच वाडवडीलांनी केलं आहे ना !’ असा हा विना पुरावा, विना तारतम्य असा पोरकट दावा असतो. तरी नशीब, ‘सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख’ असं म्हणणारे रामदास स्वामीही इथंच जन्माला आले!      
भूतकाळात रमण्याची अजून एक सोय असते ती म्हणजे ‘पुरावे उपलब्ध नाहीत कारण एवढा मोठा काळ होऊन गेला आहे’ ही पळवाट वापरता येते. वर्तमानकाळात सिद्ध व्हायचे असेल तर पुराव्यानिशी सिद्ध व्हावे लागते. विज्ञानाचा प्राथमिक गुणधर्म असा की विज्ञान कानांवर विश्वास ठेवत नाही, फक्त डोळ्यांवर विश्वास ठेवते. आमचे पूर्वज महान असतील आणि त्यांनी प्रचंड काम केलंही असेल. कदाचित त्यांच्या कामाचे काही विश्वासजनक पुरावे त्यांनी मागे सोडलेही असतील. ते पुरावे सांभाळण्या इतकेही आम्ही प्रगल्भ नसू तर आज विना पुरावा केल्या जाणार्या आमच्या दाव्यांवर इतरांनी विश्वास का आणि कसा ठेवावा? आणि मग असले पोरकट दावे करून आपणच आपली पाठ किती दिवस थोपटून घ्यायची?

आपल्याकडे सर्व काही ज्या काळात विकसित झालं होतं असा आपला दावा आहे त्या काळातील आपल्या सामाजिक वर्तनाशी त्याची संगती कशी लावायची? म्हणजे एकीकडे आपण विमान तयार करण्या इतके वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत झालो होतो त्याच काळात आपण सामाजिक-दृष्ट्या स्त्रियांना सती म्हणून जिवंत जाळण्याइतके रानटी कसे काय होतो बुवा? एकीकडे आपण सर्जरीचा शोध लावून झेप घेत होतो त्याच वेळी समुद्र पर्यटन निषिद्ध मानत होतो हे कसे का? वैज्ञानिक प्रगतीच्या खाणाखुणा तत्कालीन सामाजिक वर्तनात का दिसत नाहीत? आयुर्वेदच सर्वश्रेष्ठ असं आपल्याला म्हणायचं असेल तर जेव्हा आधुनिक वैद्यक शास्त्र उपलब्धच नव्हतं तेव्हा साथीच्या आजारांनी मरण्याचं प्रमाण आजच्या पेक्षा जास्त कसं होतं? सुश्रुतानं पहिली सर्जरी केली हे खरे असेल, पण मग शेकडो वर्षे आपण सर्जरीची कला विसरून गेलो आणि आधुनिक वैद्यकशास्त्राने ती सिद्ध केली असं म्हणावं लागतं. मधल्या काळात नेमकं काय घडलं की आपण सगळ्या कला आणि विद्या विसरूनच गेलो?

परंपरेनं आपण पारलौकिकात पारंगत असा समाज आहोत. इहलोकीचे आपले सगळे आयुष्य परलोकीचा स्वर्ग मिळावा म्हणून मृगजळाच्या मागे धावत आपण घालवायचे असते. समस्या अशी आहे की आपण त्याच पारलौकिकतेच्या कसोट्या विज्ञानासारख्या अस्सल इहवादी शास्त्राला लावायची चूक करतो. विज्ञान हा केवळ एक तर्कानं बोलायचा विषय नसून, सिद्ध करायला लावणारं शास्त्र आहे. विज्ञान हा पारलौकिक अनुभूतीचा नाही, इहलौकिक अनुभूतीचा विषय आहे. पारलौकिक बाबींमध्ये थापेबाजी, बुवाबाजी चालून जाते कारण तिथल्या गोष्टी गृहीतकापासून गृहीतकापर्यंतच प्रवास करतात. सर्व काही आभासी असल्यानं पुरावे देण्याची गरज नसते कारण जे सांगितलं ते खरं ठरलं की नाही हे मनुष्याला मृत्यूपश्चातच कळणार असतं आणि त्यापुढं सांगायचं तर त्याला मृत्युपश्चात स्वर्ग-नरका विषयी काय खरं-खोटं  कळलं तो अनुभव ‘शेअर’ करण्यासाठी पुन्हा पृथ्वीवर येता येत नाही! त्यामुळे तिकडे सगळं क्षम्य आहे. विज्ञानाचं तसं नाही. केवळ प्रमेयावर ते चालत नाही, साध्य आणि सिद्धता ही पुराव्यानिशी पटवून द्याव्या लागतात.

भारत आणि विज्ञान यांच्या संबंधांमध्ये वर्षानुवर्ष धर्मकारण उभं आहे. ते तसं युरोपातही होतं. मोठ्मोठ्या संशोधकांना चर्चनं मारून टाकल्याची भरपूर उदाहरणं आहेतच. फरक एवढाच की धर्माच्या उपयुक्ततेच्या मर्यादा लक्षात येताच ते देश धर्माच्या  गुलामगिरीतून वेगानं बाहेर पडले, हीच वैज्ञानिक मानसिकता आमच्यात अजूनही येत नाही. विज्ञान हा आमचा प्राधान्याचा विषय नाही. एकविसाव्या शतकातील आमचा देश विज्ञानातील संशोधनावर एकूण खर्चाच्या एक टक्क्या पेक्षाही कमी खर्च करतो यातच सर्वकाही आलं. फ्रांस, जर्मनी यांचं आकारमान लोकसंख्या आणि भारताचं आकारमान, लोकसंख्या लक्षात घेतले आणि त्या छोट्या देशांकडे नोबेल पुरस्कार मिळवणारे वैज्ञानिक किती आणि आपल्या विशाल देशात नोबेल पुरस्कार मिळवणारे वैज्ञानिक किती असं साधं गणित मांडलं तरी आपल्याला आपल्या वैज्ञानिक श्रेष्ठत्वाची योग्य ती प्रचिती येईल !

याचा अर्थ आपल्याकडे काहीच नव्हतं आणि सर्व काही पाश्चिमात्य देशांकडेच होतं असा अजिबातच नाही. तसं समजण्याचंही कारण नाही. आपल्याकडेही बुद्धिवान माणसं झाली, त्यांनीही मोठे शोध लावले पण अशी माणसं अक्षरश: हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आणि त्यांच्या वारसदारांनी (म्हणजे आपण) त्यांचं काम पुढे नेण्याची निष्ठा दाखवण्यापेक्षा त्यांच्या नावावर जगण्याचा ‘शॉर्टकट’ शोधण्यात धन्यता मानली. अर्थात म्हणून या मूठभर मोठ्यांचं महत्व कमी निश्चितच होत नाही. आणि हो, त्यांच्या पासून प्रेरणा घेण्याचा मार्गही आपल्यापुढे खुला आहे. तात्पर्य एवढंच की खोटा आत्मगौरव नको तशी उगाचच आत्मवंचनाही नको, नीरक्षीरविवेक हवा आहे. आपणच आपल्याला नीट ओळखलं नाही तर वाडवडिलांच्या कीर्तीवरच ‘जळो जिणे लाजिरवाणे’ असं जिणं भविष्यातही आपल्याला जगावं लागेल. भूतकाळच  आपल्याला दिसेल, वर्तमानकाळ आपल्यावर हसेल आणि भविष्यकाळ आपल्यावर रुसेल !      

डॉ. विश्वंभर चौधरी

पुणे 


No comments:

Post a Comment