Monday, April 8, 2013

झोप उडालेल्या काकांची कहाणी



(पुणे-बारामती रस्त्यावर हा कागद सापडला. ही एका काकांनी लिहिलेली स्वत:ची मनोगत वजा कहाणी दिसते. यातील नावे काल्पनिक आहेत. ती कोणाशी जुळत असल्यास निव्वळ योगायोग समजावा....)

सध्या दिल्ली भागात उन्हाळा खूप असल्याने आम्हास जल-प्राशन अंमळ जास्तच करावे लागते. दिल्ली प्रांती  जलसंपदा खाते आमच्या पक्षाकडे नसल्याने जल-पुरवठा बरा होतो. शेती खात्याचा सगळा रानमेवा खावून आणि वर आंग्ल पद्धतीचे बिसलेरी नामक साहेबांच्या प्रांतीचे पाणी पिऊन आम्ही झोपतो न झोपतो तोच रत्नागिरीहून मंगळाष्टकाचे सूर जोरजोरात आमच्या कानावर आपटून आमची झोप उडते. प्रांजळपणे सांगायचे तर मंगलाष्टक सार्वजनिक ठिकाणी म्हटले गेले तरच आमची झोपमोड होते! खाजगीत आमच्या पक्षाचे नेते अनेक ठिकाणी मंगलाष्टके गातात त्याकडे आम्ही कानाडोळा करतो! हे स्वाभाविकच आहे कारण आमच्या पक्षात असलेल्या नेत्यांची खाजगी मंगलाष्टके आमची झोप उडवू लागतील तर आमच्या सात-आठ पिढ्यांना आयुष्यभर टक्क जागेच राहावे लागेल ना ! तस्मात, दिल्ली प्रांतीचा गनीम उष्माकाल आणि रत्नागिरी प्रांतीचे लग्नकार्याचा गलबला यातून आमची निद्रा वारंवार भंग पावते....आजही आमची निद्रा भंग पावली मात्र जरा निराळ्या प्रसंगाने..
  
इंदापूर वगैरे प्रांती देखील उन्हाळा बहुत असलेने आमचे पुतणे महोदयास आंग्ल पद्धतीच्या बिसलेरी बाटल्या सारख्या ‘टाकाव्या’ लागतात आणि परिणामत: त्यांना मग अधिकच xxx लागते. तशातच आमचे पुतणे महोदय मुंबई, पुणे, बारामती अशा सर्व जहागिरी प्रांतामध्ये सतत उठबस करत असलेने प्रत्येक ठिकाणी त्यांचे xxx ची तजवीज करणे फार जिकीरीचे होऊन बसले आहे. या सर्व प्रांती सकल विकसक आमचे राजाश्रयाला असलेने आम्हास त्यांच्यासाठी भूखंडांची तजवीज करावी लागते. या सर्व प्रांतीचे सर्व भूखंड आमचे राजाश्रीतांनी विकसित केल्याने आमच्या पुतणे महाशयास xxx करण्यासाठी कोठे जावे ऐसा पेच पडला असेल. त्यातून पश्चिम घाट प्रांती काही जमीनजुमला ऐशा कार्यासाठी हासिल होता परंतु तो आमचे दुसरे मानस पुतणे म्हणजे गुलाबचंद यांचे अजित (पुन्हा अजितच! दोन अजित मिळून आम्हास कितीवेळा पराजित करतात देव जाणे!!) यांनी त्यांचे पर्यटन स्वप्नासाठी काबीज केलेने आमचे पुतणे तेथेही मोहीम फत्ते करण्याचे मनसुबे बाळगू शकत ना...आमच्या राजाश्रीत विकसकांनी चुकून सोडलेला जमीनजुमला आमच्याच आश्रयास असलेल्या उद्योजकांनी काबीज केलेने तिकडेही मोहीम काढता येईना. त्यातच आम्ही आमचे राज्यातील उरल्या-सुरल्या जागा महनीय नेत्यांचे पुतळे आणि स्मारकासाठी ‘जातीने’ लक्ष घालून राखून ठेवलेने राज्यात रिकाम्या जागा गवसण्याची मारामार.... तिकडे बारामती प्रांती त्यांनी जावे तर तिकडेही अनेक ‘उद्योग’ आमचेच कृपाशीर्वादाने चालत असलेने सर्वत्र जागांचा जणू दुष्काळ पडलेला.... अशा पेचप्रसंगात आमचे पुतणे; त्यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी राज्यात बांधलेल्या तमाम कोरड्या धरणांचा आश्रय न घेतील तर काय करतील? आणि मग त्यांचे हे स्वप्न त्यांनी जाहीरपणे सांगितले तर बिघडले कुठे? पारदर्शकता हा प्रशासनाचा अविभाज्य भाग आहे असं हे च्यानेलवाले सांगतच असतात ना सगळ्यांना ? मग पुतण्याच्या वाक्यावर एवढा गदारोळ माजवून आमची झोप पुन्हा मोडण्याची काही गरज होती का?

पण हा असं बोललाच कसा म्हणायचा? आत्ता लक्षात आलं याला महाराष्ट्रात एवढी मोठमोठी धरणं कशाला बांधायची होती ते! अरे गुलामा, याच्यासाठी सिंचन-सिंचन खेळत होतास होय १३ वर्ष! लब्बाड कुठला....आणि मला काय सांगितलस? ‘काका, तुमच्या प्रागतिक धोरणामुळं तयार होणारी भरपूर वाईन साठवण्यासाठी ही धरणं हवीत’ म्हणून! कोरड्या धरणाचा असाही उपयोग होऊ शकतो हे मात्र फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राचं नवीन संशोधनच म्हटलं पाहिजे ! यातून दोन्ही गोष्टी साध्य झाल्या...त्यानं बांधलेल्या मोठ्या कोरड्या धरणांच काय करायचं हा प्रश्न सुटला आणि त्याची xxx करण्याची सोयही झाली....खरं तर लोकोपयोगी प्रकल्प म्हणून फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं त्याचा सत्कार करायला पायजेल आहे पण उलट त्याला दादा कोंडके वगैरे म्हणून महाराष्ट्रातले टवाळ पत्रकार चिडवायला लागले. एका साडेतीन टक्केवाल्या पत्रकारानं तर “दादोजी ((कोंडदेव)चा द्वेष केल्याचा परिणाम पाहिलात? घरात दादा (कोंडके)नं जन्म घेतला” असंही कुत्सितपणे म्हटलं म्हणे...
पण बघा कसा गुणी आहे आमचा ढाण्या वाघ! तेरा वर्ष सिंचन-सिंचन खेळतोय सुनील सारखे मित्र सोबत घेऊन पण एकाही माणसाला कुठं पाणी दिसू देत नाही महाराष्ट्रात! पुण्याच्या आसपास नद्या होत्या त्याच्यावर आमच्या पठ्ठ्यानं बंगले बांधल्यानं नद्या वाहतच नाहीत, मग धरणं कोरडी राहतात आणि असा फायदा होतो...आमच्या वाघाची प्रत्येक इच्छा त्याच्या कंत्राटदार मित्रांनी पुरी केल्यानं आज पुरोगामी महाराष्ट्रातील धरणं कशी छान कोरडी ठणठणीत दिसतात, तमाम महाराष्ट्रातील मुलं या कोरड्या धरणात क्रिकेट खेळतात आणि यातूनच उद्या आयपीएल साठी नवे खेळाडू तयार होतील...केवढी ही दूरदृष्टी...पण कोणालाच त्याचं कौतुक नाही.... आता बिचार्यानं जलसंपदा खात्याचं सगळं पाणी पिऊन टाकलं म्हटल्यावर xxx लागणारच ना? आणि मग धरणं बांधण्याचा मोठा खर्च निव्वळ वाया जाण्यापेक्षा असा उपयोग केलेला काय वाईट? एक छान आयडीया डोक्यात आलीय...उजनी धरण हे नाव फारच ओल्ड फ्याशन झालं, त्याचं नाव ‘समस्त पुतणे मूत्रविसर्जन तथा जल-संकलन, संधारण केंद्र’ असं ठेवलं तर? जलसंधारण हे धोरणच आहे आमच्या शेती खात्याचं..या केंद्रातलं पाणी ‘भकास’ जनतेला आणि नद्यांचं स्वच्छ पाणी आयपीएल, लवासा अशा ‘विकास’ मंडळीनां असं पाण्याचं न्याय्य वाटप व्हायला पायजेल आहे.
आणि भार-नियमनाबद्दल सुद्धा काय क्रांतिकारी विचार आहेत माझ्या वाघाचे! आता वीज खात्याचा मंत्री म्हटल्यावर तो कसा आणि कुठून देणार वीज? लोक काहीही अपेक्षा ठेवतील उद्या...म्हणे पाणी आणि वीज द्या..! भार नियमन करूनच आपण लोकसंख्या नियंत्रणाचा सामना करू शकतो ही केवढी सुपीक कल्पना सुचली त्याला...वा...”भार नियमनातून कुटुंब नियोजनाकडे” उत्तमच घोषणा आहे. आणि विरोधी पक्षातील अनेक जण देखील फायदा घेतात या भार नियमनाचा, गाजावाजा मात्र केवळ आमच्याच पक्षाच्या लोकांचा होतो....वास्तविक राजकीय क्षेत्रातून मोठी मागणी आहे भार नियमनाला....
माझा वाघ अजून हुशार व्हावा म्हणून काय करावं बरं? चांगल्या शाळेत घालावं म्हणतो...बारामतीच्या शाळेत? नको, घरी राहून मुलं बिघडतात...पतंगरावांच्या की डीवायच्या? हं....त्यापेक्षा साताऱ्याच्या आश्रमशाळेतच पाठवतो उच्च शिक्षणासाठी....                   
***

10 comments:

  1. shabda ni shabda nishani basato agadi. Wah!!

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. चौधरी साहेब.... राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक करण्यासाठी त्यांच्याकडे दुसरे काय होते...?? धन्य ते काका अन् धन्य ते पुतणेदादा...धन्य ती टगेगीरी......

    ReplyDelete
  4. त्या काकांना म्हणाव कि , घाबरून पुतण्याला सुधारावयास घाई करण्याची आवशकता नाही. कारण या महाराष्ट्रात जो पर्यंत आपले जातभाई आहेत तो पर्यंत जनतेच्या तोंडात जरी ते **ले तरी जनता त्यांनाच निवडून देणार! कारण आपल्या माणसाचे ते शिवांबू आणि लोकांचे ते *त !! अशी धारणा या जनतेत आहे.

    ReplyDelete
  5. ethical code must for politician otherwise it will be like this only...

    ReplyDelete
  6. Jhaleli chuk hi nichitpane mafilayak nahi.Mothya padavaril ,anubhavavaril vyaktini shabdana shastra samjun agadi japun vapravet.Keval aplya mage lokmat ahe manun uchalali jeebh lavali talyala! ha prakar kami karava.Dukh dharun basu naye.

    ReplyDelete
  7. Everybody wants to take undue advantage of every situation.

    ReplyDelete
  8. शब्दांचे ओरखडे........

    ReplyDelete