Sunday, April 14, 2013

दादा कोंडके अवतारानंतर दादांचा नवा मुन्नाभाई अवतार : हा आत्म-क्लेश की ATM क्लेश?


महाराष्ट्राचे सुजाण, सुसंस्कृत आणि सुविचारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृष्णाकाठी चव्हाण साहेबांच्यापाशी आत्म्क्लेशाचा प्रयोग सुरु केला आहे. काल काकांनी सार्वजनिक ठिकाणी पत्रकार परिषदेतच त्यांना आणि त्यांचे कडवे पाठीराखे नटवर्य जितेंद्र आव्हाड यांना फटकारल्यानंतर दादांना ही उपरती झाली आणि काकांचे श्रद्धास्थान असलेल्या (म्हणजे काका नेहमी असा उल्लेख करतात म्हणूनच हे म्हणायचे, काकांच्याही वागणुकीत यशवंतराव कधीच दिसत नाहीत हा भाग वेगळा!) स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मारकापाशी जाऊन प्रायश्चित्त घ्यावे वाटावे हा विलक्षण योगायोग म्हटला पाहिजे ! अन्यथा आजचे औचित्य लक्षात घेतले तर आज आंबेडकर जयंती असल्याने दादा चैत्यभूमीवर प्रायश्चित्त घेताना दिसले असते...

काका रागावलेले आणि विरोधक तुटून पडलेले अशा अवस्थेत सत्ता जाऊ शकते आणि सत्तेतून सुरु असलेला संपत्तीचा धबधबा असा अचानक आटणे कोणत्याच पुढाऱ्याला परवडत नसते. सत्ता म्हणजे नेत्यांसाठी पैशाचे ATM असते हे लक्षात घेता हा मराठीतला आत्मक्लेश नसून इंग्रजीतला ATM क्लेश आहे हे जनता ओळखून आहे. सत्तेशिवाय अजित पवार राहूच शकत नाहीत हे त्यांच्या मागील वेळच्या लुटूपूटूच्या  राजीनामा देणे आणि पुन्हा सत्तेत येणे यावरून दिसून येतेच. तेव्हा नटवर्य जितेंद्र आव्हाड यांनी दादांना लालबहादूर शास्त्रींची उपमा दिली होती, आता थेट गांधीजींचीच उपमा द्यायला हरकत नाही! अर्थात विनोबा भावे यांनी गांधी मार्गावर चालणे आणि मुन्नाभाई एमबीबीएसने गांधीगिरी करणे यातला फरकही सुद्न्य जनता ओळखूनच असते. त्या पार्श्वभूमीवर आताचा आत्मक्लेश हा गांधी मार्गाचा स्वीकार केल्याचा देखावा असून या मागे अंतस्थ प्रेरणा आहे की ही फक्त एक राजकीय चाल आहे हे थोड्याच काळात स्पष्ट होईल.

समजा जर अजितरावांना खरंच पश्चात्ताप होत असेल तर महाराष्ट्रासाठी ही एक स्वागतार्ह बाब आहे हे मात्र नक्की....कारण तसे असेल तर पश्चात्ताप करावा अशा आणखी बऱ्याच गोष्टी त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने केल्या आहेत. लवासाला पुण्याचे पाणी पळविणे, महाकाय सिंचन घोटाळा, वीज गैरव्यवस्थापन, विविध ठिकाणच्या भूखंडांचे घोटाळे अशा अनेक कारणासाठी एकेका चुकीचे एकेक दिवस प्रायश्चित्त घ्यायचे ठरविले तर त्यांना संपूर्ण आयुष्यच प्रीतिसंगमावर काढावे लागेल कदाचित...! दादाना जन्मभर तिकडे आत्म्क्लेशाला बसवून काका धूर्तपणे सुप्रियाताईंचा राज्याभिषेक तर करणार नाहीत ना? हां धोकाही आत्म्क्लेशी अजित पवारांनी ओळखलेला बरा....अन्यथा हे इकडे आयुष्यभर कराड मध्ये आणि ताई तिकडे मंत्रालयात सहाव्या मजल्यावर असा “कात्रज”चा घाट त्यांना दाखविला जायचा !

दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी “राजीनामा घेणारच” अशी राणा भीमदेवी घोषणा केली आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रात “सेटलमेंटी” विरोधी पक्ष आहे आणि अनेक नेते पवारांच्या वळचणीला जाऊन बसलेले आहेत असा आरोप होत होता. त्या पार्श्वभूमीवर आता सगळ्या विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांना भूमिका घेणे अनिवार्यच बनले आहे.  आता उद्या विधीमंडळ सुरु झाले की विरोधी पक्ष काय भूमिका घेतात हे सगळा महाराष्ट्र पराकोटीच्या उत्कंठतेणे बघतो आहे. अजित पवारांचा राजीनामा जर विरोधी पक्ष घेऊनच राहिला तर कृष्णेच्या पाण्याने त्यांचे ही पाप काहीसे धुतले जाईल आणि जर विरोधी पक्षाने या बाबतीत “तोडपाणी” केले तर विरोधी पक्षाला निवडणुकी नंतर पुढची पाच वर्षे आत्मक्लेशच आत्मक्लेश करून घ्यावा लागेल! आता उद्या पाहू या राज्यात खरोखरच विरोधी पक्ष आहे की नाही ते!

दरम्यान अजितरावांना त्यांच्या पहिल्यावहिल्या आत्म्क्लेशासाठी हार्दिक शुभेच्छा !! असे प्रसंग त्यांच्या आयुष्यात वारंवार न येवोत !!                     

1 comment:

  1. Status Update
    By Vijay Lale
    ********प्रश्न आमचे…। उत्तरे तुमची … ******
    अजित पवारांच्या आजच्या कराड मधल्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोरील उपोषणामुळे मनात अनेक प्रश्न निर्माण झाले, त्यातले काही तुमच्याशी शेअर करतोय…. सर्वांनी उत्तरे शोधावीत… आणि वाटलेच तर प्रकट कॉमेंट स्वरुपात द्यावीत हि अपेक्षा।
    १> शरद पवारांना दादांनी आजच्या या उपोषणाबद्दल विचारले आहे का ? किंवा माहिती तरी दिली आहे का ?
    २> काल शरद पवार साहेबांनी कान उपटल्याने उपरती झाली का ? का हाही एक स्टंट आहे ?
    ३> काल एकदा थोरल्या पवार साहेबांनी अजितने जाहीर सर्वांची माफी मागितली आहे. त्यामुळे या विषयावर आता पडदा टाकायला पाहिजे असे मत व्यक्त केले होते, त्यावर दादांनी आज परत फिरून थोरल्या साहेबांवर या कृत्याने कुरघोडी केलीय का ?
    ४> दुष्काळग्रस्तांबद्दल असे उद्गार काढल्याने अजित दादांना खरेच मनातून अपराधीपणाची भावना निर्माण झाल्याने ते आज कराडला प्रायश्चित्त घेण्यासाठी आलेत?
    ५> का सगळीकडून, अगदी घरातूनही छी : थु झाल्याने अजित दादांना वैफल्य आल्याने वाटेल ती कृती करीत आहेत ?
    ६> यशवंतराव हे शरद पवारांचे राजकीय गुरु होते, आता मी सुद्धा तुमचा नव्हे तर यशवंतरावांना गुरु मानतो हे कृतीतून सांगत तुम्ही आता माझा विचार करताना केवळ तुमचा पुतण्या किंवा शिष्य नव्हे तर तुमच्या गुरूंचा शिष्य म्हणून करा असे दादा थोरल्या पवार साहेबांना दाखवून देत आहेत.
    ७> दादांना मनातून वाईट वाटले असते तर त्यांनी आज घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षा भूमीची जागा निवडली असती कारण ज्या समान न्यायाबाबत आंबेडकर आग्रही राहिले, पाणी द्यायच्या समान न्यायाचा भंग दादांनी केलाच पण वरतून अश्लील, अपशब्द वापरून लोकांची क्रूर थट्टा केली. पण दादांनी आज १४ एप्रिल च्या महामानवाच्या जयंती दिनादिवशीहि थेट यशवंतरावांची समाधी का निवडली ? का यात हि दादा जाती पातीचे अन धर्माचेच कार्ड खेळत आहेत ?
    ८> आणि दादाना आत्मक्लेशच करायचा होता तर महात्मा गांधींच्या समाधी जवळ किंवा त्यांच्या वर्ध्यातल्या आश्रमात जावून का केला नाही ? कराड निवडण्यामागचे कारण काय ?

    ReplyDelete