Tuesday, September 25, 2012

खुज्या माणसांच्या लांबलेल्या सावल्या....


खुज्या माणसांच्या लांबलेल्या सावल्या....

महाराष्ट्राचे महान त्यागमूर्ती अजितदादा पवार यांच्या राजीनामा-नाट्याचा पहिला अंक जोरदार रंगला आहे. काल संध्याकाळी अजितदादांनी “नाट्यमयरित्या” राजीनामा दिला तेंव्हा तेथे राष्ट्रवादीचे नाट्यमहर्षी, समस्त-पवार-कुटुंब-भक्त जितेंद्र आव्हाड उपस्थित होते; म्हणजे नाट्यमयता अधिकच गहिरी झाली असणार यात शंका नाही. माध्यमांमधून एक प्रकारे अजितदादा हे कसे त्यागमूर्ती आहेत हे रंगवून सांगितले जाऊ लागले. या सगळ्या गदारोळात दादा हे कोण्या उदात्त कारणाने नाही, तर फार मोठ्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे राजीनामा देत आहेत याचे भान फार थोड्या लोकांनी ठेवले होते. प्रश्न केवळ काही हजार कोटींच्या घोटाळ्याचा नसून कंत्राटदार-हितार्थ धरणांचा बांधकामाच्या दर्जात हीनता आणल्याने ही धरणे फुटल्यास लोकांची सुरक्षितताच धोक्यात येते एवढे हे गंभीर प्रकार आहे (कंत्राटदार हिताय- राजकारणी सुखाय!). तथापि अजितदादा म्हणजे जणू काही दुसरे लाल बहादूर शास्त्री असेच जितेंद्र आव्हाड यांचे बोलणे ऐकणाराचा समज व्हावा! दोन-तीन दिवसात हे राजीनामा नाट्य संपेल तेव्हा अजितदादा हे लाल-बहादूर की सौदा-बहाद्दर हे महाराष्ट्राला कळेलच. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि नैतिकता, चारित्र्य, साधनशुचिता हे शब्दच विरुद्धअर्थी असल्याने जनतेची दोन दिवस करमणूक एवढाच या घटनेचा अर्थ आज तरी दिसतो आहे.

एखादा महिनाच झाला असेल, काका केंद्र सरकारवर रुसले होते आणि त्यांच्यासह हवाई घोटाळा फेम प्रफुल्ल पटेल यांनी कार्यालयात जाणे सोडले होते. (अर्थात राजीनामा दिला नव्हता कारण दिल्लीच्या धूर्तांनी तो चपळाईने स्वीकारला असता आणि काकांची सत्ता गेली असती तर महाराष्ट्रातील पुतणे आणि तमाम मानस पुतणे यांच्या घोटाळ्यांवर पांघरूण घालायला कोण राहिले असते? त्यामुळे काकांनी ‘किमान’ त्यागाचा मार्ग अवलंबिला !!). काकांच्या केंद्राकडे नेमक्या मागण्या काय होत्या? हे अजूनही स्पष्ट झालेले नाही...अगदी जितेंद्र आव्हाड देखील त्या मागण्या सांगू शकणार नाहीत...कारण?....त्या मागण्या चार चौघात सांगण्या सारख्या नव्हत्याच....! काका रुसले, समन्वय समिती स्थापन झाली,  काका हसले, समितीचे पुढे काय झाले माहित नाही मात्र लवकरच लाचार राज्य सरकार लवासाच्या हिताचे निर्णय घेऊ लागले...जमिनी नियमित करण्याची भाषा होऊ लागली...पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीच्या घोटाळ्यांवर बोलेणासेच झाले...काकांच्या त्यागापुढे सगळ्यांनीच गुढगे टेकले...

राष्ट्रवादीला सत्तेची अफाट मस्ती चढली आहे आणि त्यात अनेक घोटाळ्यांमधून कमावलेला अमाप पैसा आणि जागोजागी पोसलेले टगे यांचे फार मोठे योगदान आहे. त्यातून महाराष्ट्रातील भ्रष्ट, कणाहीन कॉंग्रेस नेतृत्व “घालीन लोटांगण, वंदीन चरण” एवढ्याच लायकीचे असल्याने ‘दोनो उंगलिया घी में और मुंह शक्कर में’ अशी राष्ट्रवादीची चंगळ चालली आहे. हे सर्व कोठे थांबणार तेच कळत नाही.

आता पुढे काय होणार? पुतणे रुसले-पुतणे हसले होऊन राजीनामा मागे घेतला जाणार? लाचारांची फौजही पुतण्यांच्या पाठोपाठ आपले राजीनामे मागे घेणार? कॉंग्रेस पुन्हा लोटांगण घालणार? घोटाळ्यांच्या चौकशीचे काय होणार? असे सगळे प्रश्न आपल्यासमोर आहेत....एक अजून महत्वाचा प्रश्नही आहे...लाख मोलाचा...विजय पांढरे यांचं काय होणार? त्यांना मानसिक रुग्ण ठरवून, नोकरीतून काढून टाकून हे राक्षस वर विजयी हास्य करणार का?  किमानपक्षी काल राष्ट्रवादीचे प्रवक्ते शशिकांत शिंदे ज्या थाटात बोलत होते त्यावरून तरी अशी शंका बळकटच होते..असं खरंच घडलं तर......?

तर....तर आपण आपल्यातील शिवराय जागे करायचे....विजय पांढरे यांच्यामागे महाराष्ट्रातील सगळ्या कार्यकर्त्यांनी भक्कमपणे उभं रहायचं...त्यांना हात लावाल तर याद राखा असं सत्तेतल्या राक्षसांनां ठणकावून सांगायचं...आत्ताच तयारीला लागा...आपापल्या भागातील चळवळीचे कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून त्यांना तयार रहायला सांगा...विजय पांढरे यांना सरकारने धक्का जरी लावला तरी संपूर्ण महाराष्ट्रभर शांततेच्या, अहिंसेच्या मार्गानं निदर्शनं, मोर्चे, धरणे, सत्याग्रह करून आपण सरकारला वठणीवर आणायच्या निर्धाराने रस्त्यावर उतरू...शासनात राहून भ्रष्टाचार विरोधात रणशिंग फुंकणारे खोब्रागडे यांच्या सारखे तलाठी, विजय पांढरे यांच्यासारखे अभियंते यांना पाठबळ देणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे...शासनातील सगळ्या खोब्रागडे-पांढरे यांनी निर्भीडपणे घोटाळे बाहेर काढावेत, जनता म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, जनतेची तशी मनोभूमिका तयार करू.... अजितदादा किती महान आहेत, ते उपमुख्यमंत्रीपदी राहिले नाही तर महाराष्ट्राचं कसं नुकसान होईल, महाराष्ट्राचा गाडा पवारांच्या शिवाय कसा चालूच शकणार नाही, या प्रकारचे आभास, संभ्रम लाचारांच्या फौजेकडून निर्माण केले जातील...त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका...तत्ववेत्ता कार्लाईलच्या त्या जगप्रसिद्ध वाक्याची आठवण ठेवा.... “खुज्या माणसांच्या सावल्या मोठ्या व्हायला लागल्या की सूर्यास्त जवळ आला असे समजावे”.... सूर्यास्त होऊ देणं आपल्याला परवडणार नाही !!

***

6 comments:

  1. सर् खुप उद्विग्न मनाने लिहिले आहे . आज भ्रष्टाचार विरोधी सर्वच कार्यकर्ते अशाच अवस्थेत आहेत.पण अजूनही आदरणीय डॉ. अभय बंग म्हणले त्या प्रमाणे खुज्या माणसांच्या सावल्या मोठ्या दिसत असल्या तरी यांचा सूर्यास्त एवढ्या लवकर होईल असं वाटत नाही.फार मोठ्या जनजागृतीची आवश्यकता आहे,पांढरेसारख्या सज्जनाला वेडे ठरवणारे आणि अजित पवारांसारख्या गुंडाना देव समजणारी माणसं आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. देव मानणे वगैरे सब झूट है.

      जर माझ्या हितसम्बन्धान्चे रक्षण करणारे छत्र नाहीसे होत असेल तर मला झिन्दाबाद हे बेम्बी च्या देठापसून कोकलावेच लागेल. नाही तर मग माझे काय होईल?

      Delete
    2. 'आज भ्रष्टाचार विरोधी सर्वच कार्यकर्ते अशाच (उद्विग्न)अवस्थेत आहेत.'

      खूप वर्षापासून मला न उलगडलेले एक कोडे आहे. असे सर्व कार्यकर्ते एकत्र का येत नाहीत आणि मुद्यावर आधारीत एकमेकाना पाठिम्बा का देत नाहीत?

      Delete
  2. 'मुळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि नैतिकता, चारित्र्य, साधनशुचिता हे शब्दच विरुद्धअर्थी असल्याने'

    मुळात एखादा विशिष्ट पक्षच ’असा’ आहे असे म्हणणे पक्षपातीपणा चे होईल. ती लढ्याची धार कमी करते. तेव्हा विशिष्ट पक्षा ऐवजी विशिष्ट तत्वावरती / मुद्द्यावरती लक्ष्य केन्द्रित केले तर लढ्याचे पावित्र्य टिकून रहाते अणि व्यक्तिविशिष्ट मतभेदाना वाव रहात नाही.

    केवळ ’कोन्ग्रेस विरोध’ या मुद्द्यावर एकत्र आलेल्यानि ७७ साली काय दिवे लावले हे आपण उघड्या डोळ्यानी हताश हो ऊन पाहिले आहे. या इतिहासापासून आपण धडा घेणार नाही काय?

    ReplyDelete
  3. 'शासनात राहून भ्रष्टाचार विरोधात रणशिंग फुंकणारे खोब्रागडे यांच्या सारखे तलाठी, विजय पांढरे यांच्यासारखे अभियंते यांना पाठबळ देणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे'

    सर्वसामान्य माणूस हे पाठबळ कसे देवू शकतो याबद्दल थोडेसे विवेचन आणी त्या सम्बन्धी एका निरन्तर प्रचार मोहिमेची नितान्त आवश्यकता आहे.

    ReplyDelete
  4. गुरुवर्य ,
    दंडवत स्वीकारावा .

    ................ न्याय करा यमराज........

    पाणी देता देता ,पाणी पाजायचा दिवस आला,
    आश्वासनं देता देता ,राजीनाम्याचा दिवस आला.
    पण मग्रुरी आणि सरली नाही ,
    लाज मात्र उरली नाही.
    राजीनाम्यान असा काय त्रास झाला ,
    बत्ती गेली पण गाडी तीच राहिली.
    पाण्यानी मात्र जीव घेतले,
    जीव गेले पण तहान तशीच राहिली.
    जीव काढताना यम म्हणाला तहानलेला दिसतोस,काय तुझी शेवटची इच्छा,
    देवा,मी पाण्यावाचून मेलो,तेवढी दारातली तुळस मात्र जगवा.
    तथास्तु , आणि काहीतरी माग ...
    हव तर देवा मला नरकात सोडा पण ह्यांना स्वर्गात तरी न्याकी,
    आरे त्यांच्यावर " स्वर्ग सहकारी बँक "चे कर्ज आहे बाकी.
    देवा आश्या किती पिढ्यांचं पाप फेडायचय ,
    तू कर्जामुळ मेला , त्यांनी मुद्दाम स्वर्ग सहकारीच दीर्घ मुदतीच कर्ज घेतलय ,
    पण बळीराजा तुझी इच्छा मी पूर्ण करणार ;
    ................................
    ...................................
    ...................................
    सेवकहो याला नरकात टाका ,आणि इंद्राला सांगा तुमचं काय असेल ते देऊ ...पण शेतकऱ्याच्या शब्दाखातर मंत्रालयात स्वर्ग शिफ्ट करून घ्या .

    - रुपेश चंदनशिव .

    ReplyDelete