Wednesday, March 28, 2012

याद राखा !!.....तुम्ही आम्हाला मान दिलाच पाहिजे ! अन्यथा ...

काल संसदेत टीम अण्णा विरुद्ध निंदाव्यंजक ठरावावर चर्चा होऊन संसदेचा सन्मान राखण्याची तंबी देण्यात आली! मुळात संसद सदस्यांवर “याद राखा! आम्हाला मान द्या” अशी तंबी देशातील नागरिकांना देण्याची वेळच का आली? पंडित नेहरूंच्या पासून अटल बिहारींच्या पर्यंतच्या काळात अशी वेळ का आली नव्हती आणि आता एवढी घसरण झाली आहे का की अशी वेळ येते, याचा विचार तरी व्हायला हवा.

अर्थात पहिल्यांदा हे स्पष्टच केले पाहिजे की मनिष सिसोदिया यांनी ज्या भाषेत शरद यादव यांच्यावर टिप्पणी केली ते अजिबात समर्थनीय नाही. शरद यादव हे देशातील मोजक्या प्रमाणिक, वैचारिक बांधिलकीला मानणारे आणि आयुष्यात १ रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचाही ज्यांच्यावर कधी आरोपही झाला नाही अशा मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत. संसदेत ४० वर्षे त्यांनी भ्रष्टाचार विरोधात प्राणपणाने लढा दिला आहे. त्यामुळे सिसोदिया यांचे वक्तव्य एकतर त्यांच्या राजकीय अज्ञानातून किंवा अति-उत्साहामुळे आले असावे. डॉ.मनमोहनसिंग, प्रणव मुखर्जी, लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, ए बी वर्धन, गुरुदास दासगुप्ता, नितीश कुमार असे अनेक स्वच्छह राजकारणी देशात असतांना सर्वांनाच भ्रष्ट म्हणणे अजिबातच योग्य नाही याचे भान कार्यकर्त्यांनी पाळायलाच हवे, हा एक भाग झाला, मात्र संसदेची प्रतिष्ठा कोणामुळे खालावते हा प्रश्न तरीही शिल्लक राहतोच! काल संसदेत अभूतपूर्व एकी दाखविनार्या सर्व राजकीय पक्षांना आपण हे विचारायलाच हवे की संसदेची प्रतिष्ठा नेमकी वाढते कशामुळे? नोटांची बंडले सभागृहात दाखविल्यामुळे? पैसे देऊन खासदार विकत घेण्यामुळे? सभागृहात प्रश्न विचारण्यासाठी उद्योगपतींकडून पैसे घेतल्याने? वेल मध्ये उतरून गोंधळ घातल्याने? सभागृहात बील फाडून टाकल्याने? विधान भवनात अश्लील फिल्म पहिल्याने? देशासाठी महत्वाची चर्चा चालू असतांना सभागृहात अनुपस्थित राहिल्याने? वर्ष वर्ष मौनात राहिल्याने? एफडीआयच्या प्रश्नावर १२ दिवस संसद बंद पाडल्याने? सारख्या सारख्या सभात्यागाने की आणखी कशाने? आणि तरीही आम्ही बोलायचे नाही...ही संसदीय लोकशाही म्हणायची की संसदीय हुकुमशाही?

संसदेवर लोकांचा रोष नाही, तो काही संसद सदस्यांवर आहे. एखाद्या मंदिरातील काही पुजारी भ्रष्ट आहेत असे म्हटल्याने मंदिराचा किंवा देवाचा अपमान होत नसतो. टीम अन्नातील कोणीही संसदेचे महत्व नाकारलेले नाही. संसद सार्वभौम आहेच, तिला सार्वभौमत्व कोणी दिले? तर भारतीय राज्यघटनेने दिले आणि भारतीय राज्यघटना कोणी स्वीकारली? तर We, the people of India ! अर्थात “आम्ही भारतीय लोक” ! आणि म्हणून संसद सार्वभौम आहे तर भारतीय जनता तिच्याइतकीच सार्वभौम आहे कारण ती जनताच संसदेला निवडून देते, तिचे सार्वभौमत्व प्रमाणित करते....अर्थात हे समजून घेण्याचे ठरविले तर नक्कीच समजून घेता येईल मात्र झोपेचे सोंग आणायचे ठरविले तर कोणी काहीच करू शकत नाही.

सर्वांचा टीम अन्नाला सल्ला एकच....तुम्ही निवडणुका लढवून सिस्टीमचा भाग बना आणि मग बोला अन्यथा बोलू नका! या सर्वांना हे विचारले पाहिजे की ही सिस्टीम म्हणजे नेमके कोण हो? आमच्याच मताच्या जोरावर निवडून येऊन आमच्यावरच सत्ता गाजविणारे तुम्ही + आमच्याच पगारावर पोसलेले नोकर एवढे दोनच घटक म्हणजे सिस्टीम का? की मत देणारे, कर भरणारे आम्ही देखील कोणीतरी आहोत तुमच्या सिस्टीम मध्ये? आम्ही नसू तर तुमची सिस्टीम कशाच्या जीवावर चालणार? की सिस्टीम मधील आमचा सहभाग केवळ ५ वर्षातून एकदा मत दिले की संपतो? आणि आम्ही कोणालाच मत दिले नाही तर कशी चालणार हो तुमची सिस्टीम? ज्याच्यामुळे ही सिस्टीम तयार झाली त्यालाच ‘तू कोण?’ असे विचारता? निवडणूक लढविली आणि सगळे मार्ग वापरून निवडून आले म्हणजेच सिस्टीमचा भाग होता येते का? अन्यथा नाही? मग महात्मा गांधींनी, लो.टिळक, स्वा.सावरकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, हेडगेवार यांना आणि करोडो सामान्य भारतीयांना तुमच्या सिस्टीमचा भाग मानणार की नाही? निवडणुकीचा एकच दिवस लोकशाहीचा नसतो...वर्षातले इतर ३६४ दिवस देखील लोकशाहीच असते हे लक्ष्यात ठेवा, अन्यथा आमच्याशी गाठ आहे असे आता जनतेनेच सांगितले पाहिजे म्हणजे हे “सिस्टीम” नावाचे घोडे बेलगाम वैचारिकतेने चौखूर उधळणार नाही. वेळ गेलेली नाही, अजूनही स्वतःला सुधारा! सामान्य माणसाला या सिस्टीमचा केंद्रबिंदू मानून काम करा...बाबासाहेबांच्या घटनेची तुमच्याकडून तीच अपेक्षा आहे.

जेष्ठ लोक बोलतात की आम्ही संसदेचेच नाही तर घटनेचे अपराधी आहोत...साहेब, घटनेच्या ५० व्या कलमाच्या अंमलबाजावणीचा आग्रह धरणे म्हणजे घटनाद्रोह आहे का? की शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे घटनाद्रोह आहे? एकदा तुमच्या व्याख्या तरी कळू द्या आम्हाला...! आणि ज्यांनी बाबा रामदेव यांच्या आंदोलनात रात्री लोकांना झोपेत असतांना मारहाण केली, कुठलाही कायदेभंग केलेला नसतांना सकाळी अण्णांना अटक केली त्यांच्याबद्दल आपल्याला काही म्हणायचे आहे की तुमच्या निष्पक्ष धोरणात असे म्हणणे बसत नाही? त्यांनी असे करणे घटनाद्रोही नाही काय? टीम अन्नाने काय करू नये ते सांगण्यापेक्षा काय करावे ते सांगा, त्याने देशाचे अधिक कल्याण होईल..

विद्वान-प्रतिष्ठितांनी लढाईच्या मार्गावर काटे पसरविण्यापेक्षा त्यांना हा मार्ग पसंत नसेल तर दुसरा त्यांच्या पसंतीचा मार्ग दाखवावा...जनता त्यांच्या मागे येईल... मात्र कुठलाच मार्ग न दाखविता जनतेला याच फसवणुकीच्या वाटेवर चालण्यात देशाचे, संसदेचे, घटनेचे कल्याण आहे असे सांगून भ्रमित करण्याचे उद्योग सोडून द्यावेत एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. विद्वत्तापूर्ण प्रतिपादनाने जगाला क्षणभर चकित जरूर करता येते, पण भ्रष्टाचाराने गांजलेल्या प्रजेला त्यातून दिलासा मात्र मिळू शकत नाही...असा दिलासा देण्याची एक शक्यता फक्त सध्या सुरु असलेल्या आंदोलनातच काहीशी दिसत आहे, हे त्यांनी समजून घ्यावे.

***

9 comments:

  1. २८/०३/२०१२.
    डॉ. विश्वम्भर चौधरी साहेब या लेखात एकच टिप
    " एकदम बरोबर."
    चंद्रकांत वाजपेयी, जेष्ठ नाग.व सामा.कार्यकर्ता, औ.बाद.
    chandrakantvjp@gmail.com +९७३०५००५०६.

    ReplyDelete
  2. Correct sir, ur all points are correct

    ReplyDelete
  3. great write....as always.....all the best......always with you.......anoop

    ReplyDelete
  4. Dear Dr Vishawmbhar, I am partially agree with you. I really don't think Atalbihari Vajpeyi or Murli Manohar Joshi as non corrupt persons. Again you are making a mistake of just looking into economic corruption. Their behavioral corruption of distruction of socio-religious fabric was a serious corruption. Please don't lead urself on so called Team Anna's path and consider the larger issue of corruption in fractured manner. You are only hope amongst the other persons who are surrounded Mr Anna.

    ReplyDelete
  5. Very precisely written...Good Read Sir!

    ReplyDelete
  6. विश्वंभर जी , संसदेच्या सदस्यांचा अपमान वेगळा व संसदेचा वेगळा अशी व्याख्या कोणीतरी या भोंदू जनप्रतिनिधींना समजावणे आवश्यक आहे. मुळात या संसद सदस्यांची जन्म देणारी आई म्हणजेच जनता नैतिकतेच्या मार्गावरून घसरली आहे. म्हणून तिचे हे उनाड पोर ''खासदार '' बिघडले आहे. सर्व सदस्य भ्रष्ट नाहीत ,पण ब्र्ष्ट सदस्यांना सहन करून घेतात हा देखील त्यांचा नैतिक पराभव आहेच ना! आपण मांडलेला विचार म्हणजे आमचाच पर्यायाने जनतेचा विचार होय. समाजात जो पर्यंत एक व्यक्ती जरी इमानदार म्हणून जगात असेल तो पर्यंत हि लोकशाही टिकून राहील आणि ज्या दिवशी तो देखील संपला त्याच दिवशी या देशात ''नर सिंह '' नाराटला सिंह जागा होवून क्रांतीच्या ज्वाला उफाळून येतील.

    ReplyDelete
  7. Dear Dr. Vishawmbhar,
    You have expressed the truth very correctly..!
    I want to suggest you one common programm, recently Annaji announced the 14 ministers list to file the FIR till Aug 2012. In this regards we have to arrange general awairness in grass root of village area Taluka place.
    This way atleast the common man can know what there leder has done in past.
    Regards,
    Vikas Deshpande

    ReplyDelete
  8. agdi barobar sir.he majlele ahet.amcha rajakarnavar rosh nahi.tar bhrashta rajkarni lokanvar ahe.amcha sansadevar nahi tar je haramkhor swatahachya maryada visrun shirjor zale ahet tyanchyavar ahet.ek na don hazaro prakare vait goshtina virodh karnarya vyakticha avvaz aaj daabla jatoy.he ata thambavlach pahije.

    ReplyDelete