चंद्राबाबू, जरा इकडे लक्ष्य द्या....
बाभळी बंधारा आणि चंद्राबाबूंचे आंदोलन हे विषय मागच्या आठवड्यात गाजले. एका छोट्या बंधाऱ्यासाठी त्यांनी फार मोठी हाराकिरी केली. खरे पाहता आमचे राजकारणी अभ्यास करत नसल्याने त्यांना भांडायला चांगले चांगले विषय आहेत हे माहित होतच नाही. चंद्राबाबूना आवाहन आहे की त्यांनी बाभळी ऐवजी सापळी धरणाच्या विरोधात आंदोलन करावे कारण त्यामुळे आंध्र प्रदेशाचे जास्त हित सांभाळले जाईल.
मराठवाड्याचे सिंचन म्हणजे 'इतर जिल्ह्यांच्या जमिनी धरणात बुडवून नांदेड जिल्ह्याची जमीन तेवढी भिजविणे' अशी व्याख्या स्वर्गीय शंकरराव चव्हाणांनी महाराष्ट्रात रूढ केली. त्यांचे चिरंजीव असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा वारसा 'समर्थपणे' चालवीत आहेत. खरे म्हणजे अशोकराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की फक्त नांदेड (आणि बिल्डरंसाठी मुंबईचे!) मुख्यमंत्री आहेत असा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला नेहमीच सतावीत असतो. मराठवाड्याच्या नशीबी पूर्वीपासूनच दरिद्री राजकीय नेतृत्व आल्याने पश्चिम महाराष्ट्राच्या कावेबाज नेत्यांनी आधीच बरेच पाणी पळवून नेले आहे. परिणामी मराठवाड्याचा (आणि विदर्भाचा देखील) मोठा सिंचन अनुशेष कायम राहिला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दाढेतून सुटून जे पाणी मराठवाड्याच्या वाट्याला येते त्यावर केवळ नांदेड जिल्ह्याचा हक्क सांगितला जातो हे दुःख मराठवाड्यातील उर्वरीत जिल्ह्यांनी गेली साठ वर्षे उराशी कवटाळून ठेवले आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रस्तावित सापळी धरण!
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील सापळी या गावी ७ दशलक्ष घनफूट एवढ्या मोठ्या धरणाचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे (तुलनेने बाभळी बंधारा छोटा म्हणजे २.३४ दशलक्ष घनफूट एवढ्या क्षमतेचा आहे!) या धरणामुळे सुमारे २८६०० हेक्टर एवढी जमीन भिजण्याचा दावा करतांनाच महाराष्ट्राच्या जलसंपदा खात्याने पाण्याचे निर्लज्ज वाटपही स्पष्ट केले आहे. त्यांच्या दाव्यानुसार या २८,६०० हेक्टरच्या एकूण सिंचनामुळे हिंगोली जिल्ह्याची केवळ ६०० हेक्टर जमीन भिजणार आहे तर नांदेड जिल्ह्याची तब्बल २८,००० हेक्टर ! अशोकराव, अभिनंदन! अर्थात नांदेडची मोठी जमीन भिजणार असली तरी केवळ ६०० हेक्टर जमीन भिजणाऱ्या हिंगोली जिल्ह्याने मात्र यासाठी त्याग करायचा आहे तो तब्बल ५४३४ हेक्टर जमिनीचा! कृष्ण चरित्रात एक गोष्ट आहे ती म्हणजे पारिजातकाच्या झाडाची...हे झाड सत्यभामेच्या आवारात लावलेले असते आणि फुले मात्र पडतात रुक्मिणीच्या आवारात! आहे की नाही साम्य? हिंगोलीच्या आवारात धरण आणि पाणी मात्र नांदेडला...मुख्यमंत्र्यांचा विजय असो!
गमतीचा भाग म्हणजे जलसंपदा खात्याच्या विद्वान अधिकाऱ्यांनी कळमनुरी येथील २० डिसेंबर २००८ च्या लोकसुनावणीच्या वेळी एक आगळीवेगळी आणि फारच विद्वात्तापूर्ण माहिती दिली. त्यांनी असे लेखी कळविले की या धरणामुळे ५४३४ हेक्टर जमीन बुडणार असून त्यातून ६०० हेक्टर एवढीच जमीन भिजणार आहे! धन्य धन्य ते जलसंपदा खाते जे एवढा व्यवहार्य विचार करू शकते. अर्थात हा व्यवहार्य विचार केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ञ समितीने जलसंपदा खात्याच्या अकलेवर ताशेरे ओढत धुडकावून दिल्यानंतर खात्याने आकडेवारी पुन्हा एकदा बदलून टाकली. 'आकडे' या विषयात पूर्वी केवळ रतन खत्रीचा लौकिक होता, आता तो विक्रम जलसंपदा खात्याच्या 'खात्या'वर जमा झाला आहे! असो.
तर महत्वाचा मुद्दा असा की सापळी धरणाला केंद्रीय जल आयोगाची सुधारीत मान्यता नाही, योजना आयोगाची गुंतवणूक मान्यता नाही, पर्यावरण मंत्रालयाची मान्यता नाही तरीही धरण रेटण्याचा स्वार्थी डाव रेटला जातो आहे. विशेष म्हणजे गोदावरी पाणी वाटप लवादाने १९७५ सालापासून असे म्हटले आहे की इसापूर धरणानंतर महाराष्ट्राच्या वाट्याला गोदावरीचे केवळ ४.६२ दशलक्ष घनफूट एवढेच पाणी शिल्लक राहते. याचाच अर्थ असा की ७ दशलक्ष घनफूटाचे सापळी धरण रेटले गेल्यास आंध्र प्रदेशाच्या वाट्याचे २.३८ दशलक्ष घनफूट एवढे पाणी महाराष्ट्राने बेकायदेशीरपणे पळविले असेल! आणि म्हणून चंद्राबाबूंनी याकडे जास्त लक्ष्य देण्याची गरज आहे..
खरेतर बाभळी प्रश्नावर महाराष्ट्राला आंध्र प्रदेशाशी लढायचे प्रयोजन नाही कारण यात सगळ्या महाराष्ट्राचे कुठलेही हित नसून केवळ नांदेड जिल्ह्याचे तेवढे हित आहे. स्वतःच्या जिल्ह्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सगळ्या महाराष्ट्राला या वादात ओढणे चुकीचे आहे कारण भांडायचे महाराष्ट्राने आणि फायदा मात्र केवळ नांदेडचा असे हे स्वार्थी सूत्र आहे. परंतु डोके गहाण टाकलेले लोकप्रतिनिधी, लाचार पोलीस आणि माध्यमांच्या 'टाय'बहाद्दर निर्बुद्ध पत्रकारांनी हा महाराष्ट्र विरुद्ध आंध्र असा लढा असल्याचे चित्र रंगविले. वस्तुतः बाभळी बंधारा नेमका कोठे आहे हे यातील बहूतेकांना चंद्राबाबू आल्यानंतरच किंवा आल्यामुळेच कळले!
सारांश, चंद्राबाबूंना विनंती आहे कि लढायचेच असेल तर त्यांनी सापळी धरणाच्या मुद्द्यावर लढावे. चव्हाण कुटुंबीयांच्या नांदेड प्रेमामुळे होरपळून निघालेली मराठवाड्यातील हवालदिल जनता त्यांना डोक्यावर घेईल यात शंका नसावी. जय महाराष्ट्र!
No comments:
Post a Comment